Ad Advertisement Ad Advertisement

Ajanta Hills Project Shock : 2.86 Lakh Trees at Risk – अजिंठा जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल 2.86 लाख झाडांचा बळी देण्याचा घाट

‘ग्रीन वॉल’ संकटात : कर्जतच्या ८ पट वृक्ष होणार बाधित , टीओआर मंजूर; प्रोजेक्टसाठी ७५० एकर वनजमीन प्रस्तावित

Ajanta hills hydroelectric project tree felling छत्रपती संभाजीनगर : कोकणातील सह्याद्रीत वृक्षतोडीवरून वातावरण आधीच तापले असताना, आता मराठवाड्याच्या अजिंठा डोंगररांगेवरही असाच विनाशकारी घाव घातला जाण्याची चिन्हे आहेत. सोयगाव तालुक्यातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल दोन लाख ८६ हजार झाडांचा संहार केला जाऊ शकतो.

प्रचंड प्रमाणात झाडे बाधीत होणार असल्याने वन अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाबाबत नॉट रिकमंडेड (प्रकल्प उभारण्याची शिफारस नामंजूर) असा अभिप्राय दिलेला आहे. दरम्यान गेल्या १५ दिवसांपासून या क्षेत्रात वृक्ष गणनेचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वात घनदाट अशा एकमेव ग्रीन वॉलवर येऊ घातलेल्या या संकटाने पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाचा वणवा पेटवला आहे.

कोकणातील सह्याद्रीच्या पट्ट्यात (कर्जत, जि. रायगड) वीजप्रकल्पासाठीच्या वृक्षतोडीवरून सध्या एकच गहजब उडालेला आहे. विरोधी पक्षांनी सरकारला घेरले असून, रोज आंदोलने होत आहेत. या पार्श्वभुमिवर सह्याद्रीचाच भाग असलेल्या अजिंठा डोंगररांगेतील प्रस्तावित वीज प्रकल्पासाठीही वृक्षांचा गळा घोटला जाण्याची शक्यता समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कर्जतमधील वृक्षतोडीपेक्षा (३२ हजार) येथे आठपट अधिक झाडांची कत्तल केली जाऊ शकते. जिल्ह्याची ‘ग्रीन वॉल’ असलेल्या सोयगाव तालुक्यातील नायगाव परिसरात २००० मेवॅ.च्या प्रकल्पासाठी ९५०० कोटी रुपयांची गुंतवणूक हैदराबादेतील कंपनीने प्रस्तावित केली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाचा टीओआर (टर्म ऑफ रेफरन्स- संदर्भ अटी) मंजूर केला आहे.

प्रकल्पासाठी ५२९.३२ हेक्टर जमीन कंपनीने मागितली आहे. गंभीर बाब म्हणजे यापैकी ८० टक्के अर्थात ३३३.३५ हेक्टर (७५० एकर) क्षेत्र हे राखीव वन आहे. दरम्यान सॅम्पल प्लॉट सर्व्हेनुसार, या ऊर्जा प्रकल्पासाठी तब्बल २ लाख ८६००० झाडे बाधित होणार असल्याचे वन विभागाने नोंदवले आहे. जिल्ह्यातील सर्वात चांगले घनदाट वन हे अजिंठा डोंगररांगेतच आहे. येथेच कंपनी ऊर्जा प्रकल्प साकारणार असल्याने पर्यावरणावाद्यांसह नागरिकांतून त्यास विरोध होत आहे. दरम्यान, कंपनीने पर्यायी रोपणासाठी कोकणात जमीन प्रस्तावित केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

असा असेल प्रकल्प

कंपनीकडून नायगाव पंप स्टोरेज प्रोजेक्टसाठी प्रस्तावित जागेत २ जलाशये उभारली जाणार आहे. उर्ध्व (१०९ हेक्टर)आणि निम्न (११९ हेक्टर) असे ते असतील. पायथ्याशी असलेला (निम्न) जलाशय आणि माथ्यावरील (उर्ध्व) जलाशय एकमेकांना मोठा जलवाहिन्यांनी जोडले जातील. यासाठी डोंगरांत ड्रीलींग केले जाईल. यातून या वाहिन्या टाकल्या जातील. निम्न जलाशयातील पाणी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करून माथ्यावरील जलाशयात टाकले जाईल. यानंतर हे पाणी १४ टर्बाइन्सवर (जनित्र) सोडले जाईल.

टर्बाइन्स फिरून त्याद्वारे ऊर्जा निर्माण केली जाईल. स्थानिकांना या प्रकल्पात रोजगार दिला जाणार असल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आलेले आहे. हिवरा नदीतून प्रकल्पासाठी पाणी उचलले जाणार आहे. प्रकल्पासाठी बनोटी वन मंडळातील वाडी, बनोटी, घाटनांद्रा बीटातील वनखंड क्रमांक ४६१, ४६२, ४६३, ४६४, ४६५, ४६६ मधील ७५० एकर जमीन प्रस्तावित आहे. शिवाय परिसरातील नायगाव, जंगली कोठा, पळशी,घोरकुंड, गोंदेगाव व कन्नड तालुक्यातील वढोद या गावांतील ४८५ एकर शेतजमिनीही कंपनीकडून प्रस्तावित आहेत.

अखेर प्रकल्प ‘नॉट रिकमंडेड’

प्रकल्पासाठी वृक्षगणनेला वन विभागाने मंजुरी दिली असून वन विभाग आणि कंपनी कर्मचाऱ्यांकडून संयुक्तरित्या झाडांची मार्किंग केली जात आहे. राखीव वनक्षेत्रातीलच झाडेच तोडल्या गेली तर पर्यावरणाची अपरिमीत हानी होईल. ही झीज भरून काढणे प्रतिवृक्षारोपणाने शक्य नाही. याबाबत दै. पुण्यनगरीनेही सातत्याने वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर उपवनसंरक्षक कार्यालयाने प्रकल्पाला ‘नॉट रिकमंडेट’ (प्रकल्प उभारण्यास शिफारस नामंजूर) असा अभिप्राय दिलेला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सदरील वनक्षेत्र हे अभयारण्याशी संलग्न व लगतचे असल्यामुळे या परिसरात अभयारण्यातील वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. प्रस्तावित प्रकल्पक्षेेत्र हे बिबट प्रवण असून या क्षेत्रात धोकाग्रस्त खवले मांजर, मोर, कोल्हे, तरस, सायाळ, भेकर, चौसींगा, लांडगे, नीलगाय, रानडुक्कर, ससे, अस्वल, रानकुत्रे आदी वन्यप्राण्यांचा येथे अधिवास आहे. वाघाचा संचार मार्ग आहे.

‘तो’ अहवाल ठरला महत्त्वाचा

प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ शकते. अजिंठा डोंगररांगेत वन्यप्राण्यांचा मुक्त अधिवास आणि संचारमार्ग आहेत. प्रस्तावित प्रकल्पापासून ७ ते ८ किमी. हवाई अंतरात गौताळा अभयारण्य आहे. यामुळे सदरील परिसर हा प्रकल्प मुक्त असणे गरजेचे आहे असे निरीक्षण २०२१ मध्ये तत्कालीन वन अधिकाऱ्याने आपल्या अहवालात नोंदवले असून नॉट रिकमंडेड अभिप्रायासाठी तो महत्वाचा दस्तऐवज ठरला आहे.

इको-सेंसिटीव्ह झोन जाहीर करण्याची मागणी

अजिंठा डोंगररांग आणि परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने अति संवेदनशील परिसर आहे. विविध प्रकारचे आणि प्रजातींचे पशू-पक्षी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळतात. मोठ्या प्रमाणात वनसंपदा देखील येथे आहे. शिवाय याच परिसरात जागतिक वारसा स्थळ आहे. वाघांचा संचारमार्ग आहे. सह्याद्रीची उपरांग असलेल्या या डोंगरांच्या परिघाताच गौताळा अभयारण्य देखील आहे. यामुळे अजिंठा डोंगररांगचे जतन, संवर्धन होणे अत्यावश्यक आहे. करिता या डोंगररांगेचा परिसर इको-सेंसिटिव्ह झोन म्हणून जाहीर करावा अशी मागणी पर्यावरणवाद्यांतून होत आहे.

घाटनांद्रात २००० मे.वॅ.चा प्रकल्प

याच तालुक्यातील घाटनांद्रा परिसरात हैदराबादेतील दुसऱ्या एका कंपनीने २०००मेगा वॅटच्या जलविद्युत प्रकल्पासाठी पाऊल टाकले आहे. घोसला, नांदगाव आणि घाटनांद्रा या परिसरात कंपनीला जमीन हवी आहे. येथेही मोठ्या प्रमाणात वन जमिनच कंपनीकडून प्रस्तावित आहे. टीओर मंजूर असून कंपनीकडून १० हजार कोटींची गुंतवणूक येथे प्रस्तावित आहे.

अजिंठा डोंगराची महती
दख्खनच्या पठारी प्रदेशाच्या पश्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्री (पश्चिम घाट) या पर्वतश्रेणीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेस किंवा आग्नेय दिशेने अनेक डोंगररांगा गेलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या सीमेअंतर्गत तापी-पूर्णेच्या दक्षिणेस सातमाळा-अजिंठा ही डोंगररांगा आहेत. त्यांपैकी उत्तरेकडील तापी व दक्षिणेकडील गोदावरी नदीदरम्यान सातमाळा-अजिंठा, उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस भीमा नदी यादरम्यान हरिश्चंद्रगड-बालाघाट; तर उत्तरेस भीमा व दक्षिणेस कृष्णा नदी यादरम्यान महादेवाचे डोंगर आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यांत ही डोंगररांग विस्तारलेली आहे.

सोयगाव तालुक्यातील याच डोंगररांगेच्या परिघात हैदराबादेतील कंपनीकडून जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. ज्यामुळे जैवसाखळीवर मोठा आघात होऊन निसर्गाची हानी होणार आहे. सह्याद्रीच्या मुख्य समूहात या सर्व श्रेण्यांचा प्रारंभ होतो. राज्यातील या प्रमुख डोंगररांगांपैकी उत्तरेकडील, साधारणत: पश्चिम-पूर्व दिशेस पसरलेल्या तापी व गोदावरी यादरम्यानच्या डोंगररांगा या ‘सातमाळा-अजिंठा’ या नावाने ओळखल्या जातात. या डोंगररांगांच्या पश्चिमेकडील भागास सातमाळा व पूर्वेकडील भागास अजिंठ्याचे डोंगर असे संबोधले जाते. सातमाळा डोंगररांगांना चांदवड, चांदोर किंवा इंध्याद्री म्हणूनही ओळखतात. या डोंगररांगांचा प्रारंभ नाशिक जिल्ह्याच्या वायव्य भागामध्ये सह्याद्रीच्या मुख्य समूहात होतो. मुख्य सह्याद्रीपासून पूर्वेस ८० किमी. पर्यंत बेसॉल्ट खडकाची ही रांग पसरली आहे.

अजिंठ्याच्या पुढे काही किमी.वर या डोंगररांगा दक्षिणेस वळून पठारी प्रदेशात विलीन होतात. नांदेड जिल्ह्यातील यांच्या विस्तारित डोंगररांगांना निर्मळ आणि सातमाळा डोंगररांगा असे म्हणतात. यांचा विस्तार पुढे तेलंगणा राज्यात झालेला दिसतो. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यांत सातमाळा-अजिंठा डोंगररांग पसरलेली आहे. नाशिक जिल्ह्याच्या साधारण मध्यातून या डोंगररांगा गेल्या असून संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून गेलेल्या या डोंगररांगांना अजिंठ्याचे डोंगर असे म्हणतात. बुलढाणा जिल्ह्याच्या साधारण मध्यातून अजिंठा डोंगररांगा गेलेल्या आहेत. प्रामुख्याने उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी प्रकारची वनसंपदा या भागात आढळते. पश्चिमेकडील डोंगररांगांमध्ये निसर्गसुंदर गिरिस्थाने आढळतात. विंध्य पर्वताच्या पश्चिमेस मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांच्या सीमेदरम्यान असणाऱ्या डोंगररांगांनाही सातमाळा या नावाने ओळखले जाते.

E-Paper: Punyanagari E-Paper
Read About: Kriti Sanon Varun Dhawan Reunion – ‘भेडिया’ची जोडी पुन्हा एकत्र

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.