Ad Advertisement Ad Advertisement

Child marriage in Haryana : मुखवट्याआड दडलेले दु:ख

Child marriage in Haryana : जग चंद्रावर पोहोचले, गगनाला गवसणी घालणाऱ्या अनेक मोहिमांतून मानवाने धरणीचे आकाशाशी नाते जोडले, जगण्यापुढील वेगवेगळ्या समस्या सोडविण्याकरिता मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्तेची साथही मिळाली हे सारे खरे असले तरी काही समस्या मात्र शाश्वतपणे समाजाच्या मानगुटीवर ठाण मांडून बसून राहिलेल्या दिसतात. त्यापासून समाजास सुटका हवी आहे, सर्वांची तीच इच्छादेखील आहे आणि त्यासाठी व्यापक प्रयत्नदेखील सुरू आहेत. पण, त्या साऱ्याला हुलकावणी देत ही समस्या प्रयत्नांवर मात करून राहिली आहे. अशा समस्या काही काळ दडी मारून बसतात, तेव्हा त्या संपल्याच्या आनंदाने उत्सव सुरू होतो. समस्येवर मात केल्याच्या आनंदाचे भरते ओसरले की तीच पुन्हा डोके वर काढते आणि कदाचित पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने समाजाच्या आनंदावर विरजण घालण्यासाठी सज्ज होते.

या समस्यांच्या उतरंडीत सर्वांत अवघड ठरलेल्या बालविवाहाच्या समस्येने आतापर्यंत अनेकदा याचा अनुभव दिला आहे. ही समस्या कोणा एका राज्यापुरती नाही किंवा कोणा एका समूहापुरतीदेखील नाही. या समस्येने समाजजीवनाचे अवघे अवकाश व्यापून टाकले असावे असे दिसते. बालविवाह ही निष्पाप जीवांचे कोवळेपण हिरावून घेणारी क्रूर प्रथा आहे.

विज्ञानाचे बोट धरून प्रगतीच्या भराऱ्या मारणाऱ्या समाजातील लेकरे अजूनही या प्रथेच्या अग्निकुंडात होरपळत असतील, तर विकासाच्या नावाने व्यक्त होणारा आनंद हे केवळ मुखवटे आहेत आणि समस्यांनी ग्रासलेल्या त्यामागील चेहऱ्यांवरच्या दु:खाच्या रेषा लपविणारा विकास हा केवळ केविलवाणा उपाय आहे असे म्हणावे लागेल. बालविवाहाच्या या समस्येने कायद्यांनाही हुलकावणी दिली आहे. हे कायदे केवळ कागदावरच न राहता समस्येला थेट भिडतील तेव्हा या समस्येला आव्हान देणे सोपे होणार असले, तरी त्यासाठी सामाजिक मानसिकता बदलण्याचे मोठे आव्हान समाजालाच स्वीकारावे लागणार आहे.

हरियाणाच्या जींद जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात बालविवाहाची पाच संशयास्पद प्रकरणे समोर आली आणि या प्रथेने पूर्ण ताकदीनिशी डोके वर काढल्याच्या जाणिवेने देशात अस्वस्थता पसरली. ज्या प्रथेला कायमचे जखडण्याकरिता कायद्याने आपली ताकद पणाला लावली आहे, त्याला न जुमानता या प्रथेने आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखविली आहे, असा या घटनेचा स्पष्ट अर्थ आहे. या प्रकरणात स्थानिक यंत्रणांनी बजावलेली जागरूक भूमिका कौतुकास्पद आहे, पण त्यातूनच काही नवे प्रश्न अधोरेखितही झाले आहेत.

आपल्या पोटी जन्मलेल्या कोवळ्या जिवांना या प्रथेच्या जबड्यात ढकलणारी मानसिकता मातापित्यांमध्ये अजूनही मूळ धरून का राहिली आहे हा त्यापैकी महत्वाचा, संवेदनशील प्रश्न आहे. याच जींद जिल्ह्यात एका १२ वर्षांच्या कोवळ्या मुलीची लग्नगाठ एका तिशी ओलांडलेल्या व्यक्तीशी बांधण्याचा मुलीच्या जन्मदात्यांचा प्रयत्न रोखला गेला आणि अशा प्रथांना खतपाणी घालणारी मानसिकता बदलण्याची गरज स्पष्ट झाली.

सामाजिक जाणिवा जिवंत झाल्या आणि त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले तर मुलांचे बालपण हिरावून घेणाऱ्या या परंपरांना आव्हान देता येते हे यातून स्पष्ट झाले, पण हे धाडस दाखविण्याची समाजिक मानसिकताही अजून पुरेशी तयार झालेली नाही. गेल्या पाच-सहा वर्षांत केवळ कुरुक्षेत्र परिसरात बालविवाहाच्या सत्तरहून अधिक तक्रारी नोंदविल्या गेल्याचे दिसते. यापैकी जेमतेम ३० विवाह समुपदेशानातून वा कायद्याच्या हस्तक्षेपातून रोखणे शक्य झाले. काही बालविवाह मात्र कायद्याला बगल देऊन पार पडले. गेल्या वर्षभरात एकट्या हरियाणात चारशेहून अधिक बालविवाहांच्या तक्रारींची नोंद झाल्याचे सांगण्यात येते.

पुरोगामीत्वाचा सामाजिक डिंडिम वाजविणाऱ्या देशात या घटना पाहता, या दुर्दैवी प्रथेची पाळेमुळे किती घट्ट रुजलेली आहेत हे स्पष्ट होते, त्यामुळे या प्रथेमागची मानसिकता पुसली गेली पाहिजे. जुनाट रूढीपरंपरा, तारुण्याच्या उंबरठ्यावरील मुलींच्या सुरक्षिततेची चिंता, आर्थिक स्थिती, गरिबी, असे काही घटक या प्रथेला खतपाणी घालण्यास कारणीभूत असतात आणि त्यामुळे बालवयातच मुलांच्या गळ्यात लग्नाची बेडी अडकविली जाते. न्यायव्यवस्था आणि अंमलबजावणी यंत्रणांनी जागरूकता दाखविली तरी ही प्रथा बंद करण्यासाठी तेवढे पुरेसे नाही. सामाजिक सुरक्षिततेची हमी देणारी व्यवस्था, आर्थिक विषमतेची रुंदावलेली दरी बुजविण्याचे नेमके प्रयत्न, शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार अशा अनेक उपायांची एकत्रित मात्रा या प्रथेला रोखण्यासाठी दिली जाणे गरजेचे आहे.

केवळ असा एखादा विवाह रोखणे किंवा कायदेशीर कारवाई करून संबंधितांना धाक दाखविणे हा या समस्येवरील कायमस्वरूपी इलाज नाही. तो तर केवळ तात्कालिक विजय ठरू शकेल. त्याऐवजी, प्रथा-परंपरेच्या पालनासाठी बालकाचे भविष्य बळी देण्याची मानसिकता समूळ नष्ट करण्याचे कठोर प्रयत्न सुरू झाले, तरच या समस्येवर कायमचा विजय मिळू शकेल, हे आजवरच्या अनेक अनुभवांनी शिकविलेले वास्तव आहे. बालवयातील विवाह रोखला तर एका आयुष्याच्या भविष्याला सुरक्षिततेची हमी मिळाली असे मानता येणार नाही.

बालकांचे भविष्य घडविणारे शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची आणि सुरक्षिततेची हमी देणारा सामाजिक पाठिंबा आणि सहभागही आवश्यक असतो, त्यामुळे अशा प्रथेविरुद्ध जोवर समाज एकवटून पुढे येत नाही, तोवर केवळ कायद्याच्या किंवा पोलिसी यंत्रणांच्या बळावर हा लढा जिंकता येणार नाही, हे हरियाणातील ताज्या घटनेतून उघड झाले आहे. बालकांच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने उमलण्याच्या वयात त्या स्वप्नांची राखरांगोळी करण्याचा अधिकार कोणासही नाही. तसे करणे ही मानवतेला काळिमा फासणारी बाब ठरेल.

Read About : Maharashtra drought relief and free food grains : एका घासाची हमी!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.