Ad Advertisement Ad Advertisement

Diffuse Midline Glioma Treatment – लहान मुलांमधील मेंदूच्या कर्करोगावर उपचाराची नवी पद्धत विकसीत

मेंदूत इंजेक्शन दिल्यानंतर कर्करोगाच्या गाठी झाल्या नष्ट

सॅन फ्रान्सिस्को : Diffuse Midline Glioma Treatment – लहान मुलांमध्ये होणारा मेंदूचा एक कर्करोग अत्यंत घातक मानला जातो. डिफ्यूज मिडलाइन ग्लायोमा असे या कर्करोगाचे नाव आहे. ही गाठ मेंदूच्या त्या भागात वाढते जो श्वासोच्छवास, हृदयाचे ठोके आणि गिळण्याची क्रिया नियंत्रित करतो. हा आजार झालेली जवळजवळ सर्व मुले वर्षभरात दगावतात, आणि कारण सध्याचे उपचार फारसे उपयुक्त नाहीत.

या आजारावर अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या (सॅन फ्रान्सिस्को) डॉ. हिदेहो ओकाडा आणि डॉ. वेंडेल लिम यांच्या चमूने उपचाराची नवी पद्धत विकसित केली आहे. यात शरीरातील रोगप्रतिकारक पेशी, म्हणजे टी-पेशी, प्रयोगशाळेत बदलल्या जातात. या बदललेल्या पेशी मेंदूत सर्वत्र आढळणारे ब्रेव्हिकॅन हे प्रथिन ओळखतात. त्यानंतरच त्या कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणारे शस्त्र तयार करतात. रक्तात किंवा प्लीहेत असताना या पेशी निष्क्रीय राहतात. त्यामुळे शरीराच्या इतर भागाला धोका कमी होतो.

प्रयोग उंदरांवर

या संशोधनाचे निकाल लक्षवेधी आहेत. मेंदूत थेट इंजेक्शन दिल्यावर दोन वेगवेगळ्या प्रयोगांतील सर्व उंदरांमधील गाठी नष्ट झाल्या. सुमारे सात आठवड्यांनी त्याच उंदरांत पुन्हा कर्करोगाच्या पेशी सोडल्या, तेव्हा सर्वांच्या शरीराने त्या नाकारल्या. म्हणजे शरीराने या कर्करोगाची आठवण ठेवली होती. या पेशी ७० दिवसांहून अधिक काळ सक्रिय राहिल्या. हे संशोधन ह्यसायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन या नियतकालिकात २८ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झाले. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हे सर्व प्रयोग उंदरांवर झाले आहेत.

एप्रिलपासून मानवावर चाचण्या

माणसांवर हा उपचार किती सुरक्षित आणि परिणामकारक आहे, हे अजून तपासलेले नाही. एप्रिल २०२७ पासून रुग्णांवर चाचण्या सुरू करण्याचा संशोधकांचा विचार आहे. त्यामुळे या पालकांसाठी आशेचा एक नवा किरण दिसू लागला आहे.

Read About : Cancer Medicine Price Cut – 9 नोव्हेंबरपासून पासून कर्करोगाचे लाखाचे औषध काही हजारांत E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.