आईच्या डोळ्यांसमोर घडला रक्तरंजित थरार, मोबाईलच्या हट्टापायी रक्ताच्या नात्याचाच बळी
तुळजापूर Tuljapur Father Murder Case : हातातील मोबाईलचे वेड इतके विकोपाला जाऊ शकते की, त्यासाठी जन्मदात्या वडिलांचाच जीव घेतला जाईल, याची कल्पनाही कोणी केली नसेल. परंतु, मोबाईल घेण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून पोटच्या मुलाने स्वत:च्या जन्मदात्या वडिलांच्या डोक्यावर लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला करत त्यांचा खून केला. ही धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील येवती येथील डोंबाळे वस्तीवर मंगळवारी (दि.१०) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात खंडू डोंबाळे (वय ५६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मुलगा श्रीशैल ऊर्फ बबलू खंडू डोंबाळे (वय २९) याला नळदुर्ग पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.१० नोव्हेंबर रोजी रात्री जेवण झाल्यानंतर श्रीशैल याने वडील खंडू डोंबाळे यांच्याकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, सध्या पैसे उपलब्ध नसल्याने नंतर मोबाईल घेऊन देतो, असे वडिलांनी सांगितले. परंतु, मोबाईलचा हट्ट सोडण्यास तयार नसलेल्या मुलाचा वडिलांशी वाद झाला. या वादानंतर श्रीशैल घराबाहेर निघून गेला. मात्र, या किरकोळ वाटणाऱ्या वादाचे रूप पुढे इतक्या भयानक घटनेत होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास घराबाहेर आरडाओरडा आणि किंकाळ्यांचा आवाज ऐकू आल्याने आई सुरेखा यांनी घराचा दरवाजा उघडला.
त्यावेळी श्रीशैल हा लोखंडी पाइपने वडील खंडू यांच्या डोक्यावर वार करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जन्मदात्या वडिलांवर मुलाकडून सुरू असलेला हा हल्ला पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आईला पाहताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या खंडू डोंबाळे यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने अणदूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. एका क्षणात हसतेखेळते कुटुंब दु:खाच्या गर्तेत लोटले गेले.
पुन्हा घटनास्थळी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला
या घटनेनंतर आरोपी काही वेळाने पुन्हा घटनास्थळी आला. मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्यामुळे वडिलांना मारहाण केल्याचे त्याने उपस्थितांसमोर सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आडोशाला लपलेल्या आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कागुणे, पोलीस उपनिरीक्षक अख्तर सय्यद, इटकळ बीटचे पोलीस अंमलदार नवनाथ चाबुकस्वार, सुदर्शन घुले आणि चालक मायाचारी यांनी सहभाग घेतला.
मोबाईलच्या अति वापरामुळे होणारे दुष्परिणाम
मोबाईल वापरताना सतत मान खाली झुकवली जाते. यामुळे मणक्यावर जास्त ताण पडतो. तरुण वयातच मान, खांदे आणि पाठ दुखण्याच्या तक्रारी वाढत आहेत. डोळ्यांवर पडणारा ताण आपण तासनतास मोबाईलच्या स्क्रीनकडे बघत राहतो, फोनचा तो प्रखर उजेड सतत डोळ्यांवर पडल्यामुळे डोळ्यांची आग होणे, डोळे कोरडे पडल्यासारखे वाटणे किंवा डोळ्यातून पाणी येणे अशा तक्रारी सुरू होतात. इतकंच नाही, तर सतत स्क्रीनकडे बघितल्याने डोकं जड होतं आणि कमी वयातच नजर कमजोर होऊन चष्म्याचा नंबर वाढू लागतो.
मोबाईल वापराचे दुष्परिणाम टाळण्यासाठी
- दररोज किती वेळ मोबाईल वापरता याचं भान ठेवा. गरज नसताना मोबाईल हातात घेणं टाळा.
- किमान 1 तास आधी मोबाईल बाजूला ठेवा. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
- मोबाईल वापरताना मान सरळ ठेवा आणि फोन डोळ्यांच्या उंचीवर धरून वापरा.
- 20-20-20 नियम वापरा. थंड पाण्याने डोळे धुवा आणि स्क्रीन ब्राइटनेस कमी ठेवा.
- घरच्यांशी, मित्रांशी प्रत्यक्ष बोला. मोबाईलपेक्षा माणसांना जास्त वेळ द्या.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Diwali Celebration Away from Home – घरापासून दूर, पण मायेच्या घासाने दिवाळी गोड!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.