आरोपींना न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी : शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गेवराई Gevrai sword attack : पेटलेल्या फटाक्याची ठिणगी अंगावर पडल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर थेट तलवारबाजीत झाले. मंगळवारी (दि.१०) रात्री ८ वाजेच्या सुमारास शहरातील कुंभार गल्ली परिसरात हा प्रकार घडला. एका टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने केलेल्या हल्ल्यात पाच युवक गंभीर जखमी झाले असून, या घटनेने गेवराई शहरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी गेवराई पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली असून, आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अन्य दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, ‘अरे पेटलेला फटाका अंगावर आला असता ना, दिसत नाही का?’ असे म्हटल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. यावेळी मुख्य संशयितांनी तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने ओम गायकवाड, गणेश गोरे, सार्थक सुनील खडके, ओम गणेश खडके आणि सुनील सुधाकर खडके हे पाच युवक गंभीर जखमी झाले. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित अक्षय राऊत, राहुल शेलार यांच्यासह एका महिलेला बुधवारी (दि.११) पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
गेवराईत गुंडाराज वाढतेय?
गेल्या काही दिवसांपासून गेवराई शहरात घडणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गत आठवड्यात एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आता तलवारबाजीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर काही तरुणांकडून भरधाव वेगाने दुचाकी चालवणे, फटाके फोडणे आणि शाळा-महाविद्यालय परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रस्त्यावरून जाताना दुचाकीस्वारांच्या वेगाचा धोका पत्करावा लागत आहे. त्यामुळे अशा मोकाट टोळक्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
अप्पर अधीक्षक घटनास्थळी
तलवारबाजीच्या घटनेची पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बुधवारी दुपारी १२ वाजता गेवराई पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख बुद्धीराज सुकाळे यांच्यासह घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पोलिसांना आवश्यक सूचना देऊन शहरातील गस्त वाढविण्याचे निर्देश दिले.
‘शहरातील घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये पायी गस्त सुरू केली असून, विशेष पथके तयार केली आहेत. गुन्हेगारांवर कारवाई सुरू असून, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.
– बुद्धीराज सुकाळे, ठाणेप्रमुख, गेवराई
Read About : Antarctica Glacier Melting : नासाच्या उपग्रह छायाचित्रांत दिसली कवटीसारखी रचना
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.