Ad Advertisement Ad Advertisement

Parbhani Go Gas Fraud – गॅस पंपावर 8 हजार 211 लिटर एलपीजी गॅसची अफरातफर

गो गॅस : ६ लाख ८० हजारांचा अपहार, व्यवस्थापकासह चौघांविरूध्द गुन्हा

परभणी Parbhani Go Gas Fraud : शहरातील गंगाखेड रोडवरील रुची हॉटेलजवळील गो गॅस एलपीजी पंपावर ८ हजार २११ लिटर गॅसची अनधिकृतपणे विक्री करून ६ लाख ८० हजार ७७८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंप व्यवस्थापकासह चौघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात रोहित मनोहर गवळे यांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते कोन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये महाराष्ट्र राज्य प्रभारी अधिकारी म्हणून काम करतात. तक्रारीनुसार, कंपनीचा गंगाखेड रोडवरील रुची हॉटेलसमोरील गो गॅस या नावाने एलपीजी गॅसचा पंप कंपनीमार्फत चालवला जातो. सदर पंपावर मॅनेजर म्हणून हनुमान शिसोदे हे नोकरीस आहेत. त्यांच्यासोबत डिलिव्हरी बॉय म्हणून प्रल्हाद चव्हाण, नामदेव चव्हाण, किरण कच्छवे हे नोकरी करतात.

३० ऑक्टोबर रोजी तक्रारदार यांच्या मोबाईलवर राकेश शर्मा (टेक्निकल मॅनेजर, नागपूर) यांनी फोनद्वारे कळवले की, गो गॅस पंप रुची हॉटेलजवळ, गंगाखेड रोड, परभणी येथे २७ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान गॅस विक्रीच्या स्टॉक रिडिंगमध्ये तफावत येत आहे. एकूण ८ हजार २११ लिटर गॅसची विक्री केलेली असून त्याची रक्कम किंमत ६ लाख ८० हजार ७७८ रुपये आहे. सदरची रक्कम ही कंपनीला प्राप्त झालेली नाही. या संदर्भात चौकशीसाठी गो गॅस पंपावर रोहीत गवळे असता प्रथम तपासणीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, टँक डिलिव्हरी, डिस्पेन्सर डिलिव्हरी तपासले असता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापलेली दिसून आली.

त्यानंतर पंपासमोरील रुची हॉटेलसमोर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी संशयित तीन वाहने येतात व सिलिंडरमध्ये गॅस भरून घेऊन जात असल्याचे दिसत आहे. सदरचे फुटेज पाहून पंपावर काम करणारे व्यवस्थापक व डिलिव्हरी बॉय यांना सदरची वाहने कोणाची आहेत व त्यामध्ये कोणी गॅस भरला याबाबत विचारणा केली असता आम्हाला माहित नाही, असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली.

कंपनीचा विश्वासघात

या प्रकारचा संशय असल्याने पंपावर विश्वासाने कामावर ठेवले असता त्यांनी कंपनीच्या संमतीविना एकूण ८ हजार २११ लिटर एलपीजी गॅसची अनधिकृतपणे विक्री करून कंपनीचा नाहक विश्वासघात करून रक्कम किंमत ६ लाख ८० हजार ७७८ रुपयांचा अपहार केल्याची माहिती दिली. सदर माहितीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात हनुमान शिसोदे, प्रल्हाद चव्हाण, नामदेव चव्हाण, किरण कच्छवे यांच्याविरुद्ध गुरनं ५३७/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३ (५), ३१६ (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Read About : Diwali Celebration Away from Home – घरापासून दूर, पण मायेच्या घासाने दिवाळी गोड!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.