Ad Advertisement Ad Advertisement

Europe Bomb Threats – युरोपच्या आकाशात गदारोळ

विमानांवर बॉम्बहल्ल्याच्या धमक्यांचे पुन्हा सत्र, अनेक विमानांचे आपत्कालीन लँडिंग

लंडन : Europe Bomb Threats – युरोपमध्ये विमानांवर बॉम्बहल्ल्याच्या धमक्यांचे सत्र थांबायला तयार नाही. गुरुवारी १२ प्रवासी विमानांना अशा धमक्या आल्या. त्यामुळे काहींना तातडीने उतरवावे लागले, तर काहींचा मार्ग बदलावा लागला. दोन दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडला होता. डब्लिनहून रोमला निघालेल्या एअर लिंगसच्या विमानाने उड्डाणानंतर दीड तासाने आणीबाणीचा संकेत दिला. फ्रान्सच्या हवाई दलाने तत्काळ लढाऊ विमाने पाठवली आणि पॅरिसच्या पश्चिमेकडील एव्हरो हवाई तळावर ते उतरवले. फ्रान्सच्या पंतप्रधान कार्यालयानुसार, १५१ प्रवासी आणि सहा कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आणि बॉम्बशोधक पथकाने विमानाची तपासणी केली. एका प्रवासी महिलेने सांगितले की ती घाबरून बायबल वाचत होती. वैमानिकाने आधी तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितले होते.


बल्गेरियात तीन विमाने आपत्कालीन स्थितीत उतरली. लंडनहून आलेले रायनएअरचे विमान प्लोवदिवला, तर कोपनहेगन आणि माद्रिदहून आलेली विमाने सोफियात उतरली. तपासणीत तिन्ही विमानांत काहीही आढळले नाही. प्रागकडे जाणाऱ्या चार विमानांनाही लक्ष्य करण्याच्या धमक्या आल्या. झेक पोलिसांनी त्या फारशा विश्वासार्ह नसल्याचे सांगितले, तरीही धोका नको म्हणून सर्व विमानांची तपासणी केली. अर्थात यात काहीही आढळले नाही; या धमक्यांचा तपास झेेक दहशतवादविरोधी केंद्राकडे सोपवण्यात आला आहे.

व्हिएन्नात दोनदा तपासणी

मिलानहून वॉर्साला जाणारे विझएअरचे विमान व्हिएन्नाकडे वळवले गेले. सुरक्षेच्या ठरलेल्या नियमांनुसारच हा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले. वॉर्साहून ब्रसेल्सला गेलेल्या एलओटीच्या विमानाची दोनदा तपासणी झाली, पण काहीच सापडले नाही. हेलसिंकीहून रोमला जाणारे फिनएअरचे विमान लढाऊ विमानाच्या संरक्षणात पोहोचले.

मंगळवारीही आल्या होत्या धमक्या

याआधी मंगळवारीही किमान सात विमाने आणि एका क्रूझ जहाजाला अशा धमक्या आल्या होत्या. तेव्हा वॉर्साबाहेरील एक विमानतळ काही काळ बंद ठेवावे लागले होते. मात्र कुठेही बॉम्ब सापडला नाही. या धमक्यांची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही आणि अधिकाऱ्यांनीही कोणाला दोषी ठरवलेले नाही. पण युरोपमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. युरोपीय अधिकारी रशिया आणि इराणवर ‘हायब्रिड हल्ल्यां’चे आरोप करत आहेत.

Read About : Refrigerator Cyber Attack : सायबर हल्ल्यांचा पॅटर्न बदलला, युरोपमधील 9 देशांतील शेकडो सुपरमार्केट्सचे फ्रीज हॅक
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.