हॅकर्सनी दूरवरून सुपरमार्केटच्या डिजिटल रेफ्रिजरेशन यंत्रणेचा ताबा मिळवत फ्रीजचे तापमान वाढवले
पॅरिस : Refrigerator Cyber Attack सायबर हल्ल्यांची व्याप्ती आता केवळ डेटा चोरी किंवा बँकिंग फसवणुकीपुरती मर्यादित राहिलेली नाही. हॅकर्स आता संगणक स्क्रीनच्या बाहेर पडून वास्तविक जगातील मशिन्स आणि भौतिक सेवांना लक्ष्य करत आहेत. याचा सर्वात मोठा फटका युरोपमधील अन्नपुरवठा साखळीला बसला असून, हॅकर्सनी सुपरमार्केटच्या डिजिटल रेफ्रिजरेशन यंत्रणेवर (शीतकरण व्यवस्था) ताबा मिळवला आहे.
१ आणि २ नोव्हेंबर २०२६ च्या रात्री बेल्जियम, स्वीडन, आयर्लंड, फिनलंड, एस्टोनिया, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड्ससह ९ युरोपीय देशांमधील शेकडो सुपरमार्केट्सच्या फ्रीजवर भीषण सायबर हल्ला झाला.
हॅकर्सनी एका केंद्रीय डिजिटल प्रणालीद्वारे दूरवरून फ्रीझरचे तापमान थेट ५० अंश सेल्सिअस पर्यंत वाढवले. यामुळे बेल्जियममधील कॅरेफोरचे १५ स्टोअर्स, डेल्हाइझचे सुमारे ४० स्टोअर्स, आयर्लंडमधील सुपरवॅल्यूचे १३ स्टोअर्स आणि स्वीडनमधील आयसीए व कूपचे अनेक स्टोअर्स प्रभावित झाले. केवळ बेल्जियममधील एका दुकानात १ लाख युरो (सुमारे ९१ लाख रुपये) किंमतीचे अन्नपदार्थ एका रात्रीत सडले, तर एका खाटीक दुकानाचे १५,००० युरो चे नुकसान झाले. यापूर्वी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी फ्रान्समधील जवळपास ७०० सुपरमार्केट्सवर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता, ज्यामध्ये शेकडो टन अन्न फेकून द्यावे लागले होते.
हॅकर्सना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही
मोठ्या स्टोअर्समधील शेकडो फ्रीज आणि फ्रीझर एका केंद्रीय डिजिटल प्रणालीद्वारे नियंत्रित केले जातात. कर्मचारी एकाच जागेवरून तापमानावर लक्ष ठेवू शकतात आणि गरज पडल्यास दूरवरून सेटिंग्ज बदलू शकतात. जर या प्रणालीची सुरक्षा कमकुवत असेल, तर हल्लेखोर त्यात अनधिकृत प्रवेश करून तापमान वाढवू शकतात किंवा कूलिंग थांबवू शकतात. यामुळे दुकानातील अन्नपदार्थांचे नुकसान करण्यासाठी हल्लेखोराला तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अजिबात गरज पडत नाही. युरोपमधील या घटनांकडे गेल्या दोन-तीन वर्षांत समोर आलेल्या इतर सायबर हल्ल्यांच्या संदर्भातून पाहिले, तर एक मोठा बदल दिसून येतो. आता हल्ल्यांचा परिणाम केवळ कॉम्प्युटरच्या स्क्रीनपुरता मर्यादित नसून, वास्तविक जगातील सेवा आणि मशिनरींवरही होत आहे.
आयटी विरुद्ध ओटी, सुरक्षेतील मोठी त्रुटी
तज्ज्ञांच्या मते, संगणक आणि डेटा हॅक करण्याला आयटी सिस्टमवरील हल्ला म्हणतात. परंतु, रेफ्रिजरेटर, वीज ग्रीड आणि कारखाने नियंत्रित करणाऱ्या तंत्रज्ञानाला ऑपरेशनल टेक्नॉलॉजी म्हटले जाते. युरोपमधील सुपरमार्केटमध्ये जुने सॉफ्टवेअर, कमकुवत ४जी नेटवर्क आणि डिफॉल्ट पासवर्डचा वापर केल्यामुळे हॅकर्सनी ओटी यंत्रणेत सहज प्रवेश मिळवला. हा बदलता सायबर धोका थेट मानवी जीवनाशी आणि अन्न सुरक्षेशी जोडला गेला आहे.
गेल्या काही वर्षांतील प्रमुख सायबर हल्ले
सप्टेंबर २०२३ (एमजीएम रिसॉर्ट्स, अमेरिका): हॅकर्सनी कंपनीचे कॉम्प्युटर नेटवर्क हॅक केले, ज्यामुळे हॉटेल बुकिंग, डिजिटल चेक-इन, इलेक्ट्रॉनिक चाब्या आणि पेमेंट सेवा ठप्प झाल्या. हॉटेल व्यवसायाला अनेक दिवस याचा फटका सहन करावा लागला.
फेब्रुवारी २०२४ (चेंज हेल्थकेअर, अमेरिका): या कंपनीवर झालेल्या रॅन्समवेअर हल्ल्यामुळे रुग्णालये, फार्मसी आणि आरोग्य सेवा पुरवठादारांचे पेमेंट आणि औषधांशी संबंधित प्रक्रिया विस्कळीत झाल्या. ही कंपनी अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेत विमा दावे आणि पेमेंट प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते.
जुलै-ऑगस्ट २०२४ (विमानतळ सायबर हल्ले): २२ जुलै २०२४ रोजी क्रोएशियाच्या स्प्लिट विमानतळाच्या आयटी यंत्रणेवर हल्ला झाला, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मॅन्युअली काम करावे लागले. ऑगस्ट २०२४ मध्ये अमेरिकेच्या सिएटल-टकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यामुळे चेक-इन, बॅगेज हँडलिंग आणि इतर डिजिटल सेवा प्रभावित झाल्या.
एप्रिल-मे २०२५ (मार्क्स अँड स्पेन्सर, ब्रिटन): ब्रिटनच्या मार्क्स अँड स्पेन्सर या किरकोळ विक्री कंपनीने सायबर हल्ल्याची पुष्टी केली. १३ मे २०२५ रोजी त्यांनी सांगितले की, काही ग्राहकांचा वैयक्तिक डेटा चोरीला गेला आहे, ज्यामुळे ऑनलाइन सेवांवर परिणाम झाला.
सप्टेंबर २०२५ (जग्वार लँड रोव्हर, ब्रिटन): १९ सप्टेंबर २०२५ रोजी ब्रिटिश सरकारने जग्वार लँड रोव्हरवरील सायबर हल्ल्याच्या प्रभावाबाबत ऑटोमोबाईल उद्योगाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या हल्ल्यामुळे उत्पादन क्रिया विस्कळीत झाल्या आणि त्याचा फटका पुरवठादारांनाही बसला.
सप्टेंबर २०२५ (विमान वाहतूक क्षेत्र): सर्वात गाजलेल्या घटनांपैकी एक १९ सप्टेंबर २०२५ रोजी घडली, जेव्हा कोलिन्स एयरोस्पेसच्या म्यूज सॉफ्टवेअरवर सायबर हल्ला झाला. यामुळे लंडनचे हिथ्रो, ब्रुसेल्स आणि बर्लिनसह युरोपमधील अनेक मोठ्या विमानतळांवरील चेक-इन आणि बोर्डिंग व्यवस्था कोलमडली.
Read About : Digital Arrest Scam in Sambhajinagar – कंपनी अधिकाऱ्याला 9 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ ठेवून 9.90 लाखांचा गंडा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.