फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल, अल्बेनियातही निदर्शने; हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांसह लष्करही तैनात
Europe protests over rising living costs : मिलान-पॅरिस-माद्रिद : महागाई, इंधन दरवाढ, महागडे शिक्षण, सरकारी धोरणांविरोधात शनिवारी पुन्हा युरोपातील फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल, अल्बेनियात निदर्शने करण्यात आली. लाखो लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. मात्र गत आठवड्यात आंदोलनात आंदोलनासोबतच झालेला हिंसाचार, जाळपोळ, लुटालुट, तोडफोड पाहता यंदा सर्वच देशांनी मोठी खबरदारी घेतली होती.
कोणतीही अप्रिय घटना रोखण्यासाठी हजारो पोलीस कर्मचाऱ्यांसह लष्कराचे जवानही तैनात करण्यात आले होते. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये तब्बल ७० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आल्याने संपूर्ण शहराला छावणीचे रूप आले होते. सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना शहराच्या मध्यवर्ती भागापासून दूर रोखले होते. प्रशासनाने हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
१. इटली
राजधानी रोममध्येही महागड्या खरेदीच्या बाजारपेठा आणि प्रमुख चौकांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि युद्धविरोधी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार पसरू नये म्हणून कडक निगराणी ठेवली जात आहे. फॅशन जगताचे केंद्र असलेल्या मिलानमध्ये ५,००० पोलीस कर्मचाऱ्यांसोबत ५०० अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे पाळत आणि रेल्वे स्थानकांवर विशेष तपासणी केली जात आहे.
२. अल्बेनिया (तिराना)
अल्बेनियाची राजधानी तिराना येथे विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. शालेय व महाविद्यालयीन शुल्क कमी करणे, शिक्षणासाठी सरकारी निधी वाढवणे आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखणे, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक, पेट्रोल बॉम्ब आणि फटाके फेकून निदर्शने केली, तर पोलिसांनी अश्रुधूर आणि वॉटर कॅनॉनचा वापर केला.
३. स्पेन (माद्रिद)
स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये निवृत्तिवेतनधारक आणि नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारी पेन्शन योजनेचे खाजगीकरण न करण्याची मागणी निवृत्तिवेतनधारक करत आहेत. पर्यटन आणि वाढत्या लोकसंख्येमुळे स्पेनमध्ये भाड्याची घरे मिळणे कठीण झाले आहे. सप्टेंबरमध्ये एका ८७ वर्षीय वृद्ध महिलेला घरातून बाहेर काढल्यानंतर स्पेनमध्ये आंदोलनाची लाट पसरली असून, माद्रिदच्या पुएर्ता डेल सोल चौकात महिनाभरापासून आंदोलक तंबू ठोकून बसले आहेत.
४. पोर्तुगाल (लिस्बन)
स्पेनमधील आंदोलनाचे लोण पोर्तुगालमध्येही पोहोचले आहे. राजधानी लिस्बनमध्ये परवडणाऱ्या घरांच्या मागणीसाठी नागरिक मोर्चा काढत आहेत. पंतप्रधान लुईस माँटेनिग्रो यांच्या सरकारने घरभाडे वाढीवरील मर्यादा उठवणे आणि भाडे न देणाऱ्यांना घरातून काढणे सोपे करणाऱ्या नियमांना मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिक आणि भाडेकरू रस्त्यावर उतरले आहेत.
Read About : China border tensions in Arunachal Pradesh- चीनच्या कुरापती सुरूच !
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.