Ad Advertisement Ad Advertisement

Ghati Nurses Protest – महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनतर्फे घाटीत निदर्शने

सोलापूर उत्तरपत्रिका तपासणीतील कथित अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी | दोषींवर कठोर कारवाईसाठी शासनाचे लक्ष वेधले

छत्रपती संभाजीनगर : Ghati Nurses Protest सोलापूर येथील जीएनएम (जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी) परीक्षांच्या कॅप राऊंडदरम्यान उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याच्या प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने शुक्रवारी (दि.३०) तीव्र निदर्शने करण्यात आली. फेडरेशनच्या जिल्हा शाखांच्या वतीने सकाळच्या सत्रात एक तास निदर्शने करून शासनाचे लक्ष या गंभीर प्रकरणाकडे वेधण्यात आले.

सोलापूर येथील जीएनएम परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याबाबत प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेत फेडरेशनने या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. उत्तरपत्रिका महाविद्यालयाबाहेर नेण्यात आल्या होत्या का, त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील नियमांचे पालन झाले होते का, तसेच गुणनोंदींमध्ये कोणताही फेरफार झाला आहे का, याची उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निदर्शनांदरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका फेडरेशनने मांडली. परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता, गुणवत्तेचे निकष आणि निकालाची विश्वासार्हता अबाधित राहणे आवश्यक आहे.

परिचर्या शिक्षणातून भविष्यातील आरोग्यसेवेची पायाभरणी होत असल्याने या प्रकरणाकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, असेही संघटनेने स्पष्ट केले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तरपत्रिकांच्या सुरक्षिततेच्या नोंदी, उपलब्ध सीसीटीव्ही चित्रण, उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीची माहिती, मूळ उत्तरपत्रिका आणि गुणनोंदी यांची पडताळणी करण्यात यावी. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनच्या संस्थापक सल्लागार कमल वायकोळे, राज्याध्यक्ष इंदुमती थोरात, राज्य सरचिटणीस विशाल सोनार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात परिचारीकांनी सहभाग नोंदविला.

Read About : MPhil BARTI Fellowship PhD Admission एम.फिल; बार्टी फेलोशिपवर थेट पीएच.डी. प्रवेशाचा हक्क नाही
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.