पृथ्वीपासून २८० ते ३२६ प्रकाशवर्षांच्या अंतरावर
लंडन : Green white dwarf star – आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांचे रंग आपण अनेकदा पाहतो, पण एखादा तारा खरोखरच हिरवा दिसू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर ब्रिटनमधील वॉरविक विद्यापीठाच्या खगोलशास्त्रज्ञांनी शोधले आहे. त्यांनी मानवी डोळ्यांना स्पष्टपणे हिरवा दिसणारा विश्वातील पहिला हिरवा तारा शोधून काढला असून, तो आपल्याच आकाशगंगेत आहे हे विशेष.
डब्ल्यूडी जे१३३०+६४३५ असे नाव असलेला हा तारा एक श्वेत बटू असून, तो पृथ्वीपासून २८० ते ३२६ प्रकाशवर्षांच्या अंतरावर आहे. श्वेत बटू म्हणजे सूर्यासारख्या ताऱ्याचे आयुष्य संपल्यानंतर उरलेला अत्यंत घनदाट असा शेवटचा भाग. या ताऱ्याचे तापमान सुमारे ४,००० अंश सेल्सिअस इतके आहे. सामान्यत: ताऱ्यांचा रंग त्यांच्या तापमानावर ठरतो; जसे की थंड तारे नारिंगी आणि गरम तारे पांढरे किंवा निळे दिसतात. मात्र, या ताऱ्याच्या बाबतीत एक वेगळीच गोष्ट घडली. या ताऱ्याच्या वातावरणात त्याच्या जुन्या ग्रहप्रणालीतील खडकाळ अवशेष येऊन मिसळले. यामुळे त्यात कॅल्शियम, लिथियम आणि प्रामुख्याने सोडियमचे प्रमाण वाढले. या ताऱ्याचे वातावरण अतिशय घनदाट असल्याने, त्यातील सोडियमने पिवळा, नारिंगी आणि लाल रंगाचा प्रकाश शोषून घेतला. परिणामी, मागे उरलेला प्रकाश मानवी डोळ्यांना फिकट हिरवा रंगाचा दिसतो.
रंगीबेरंगी तारेही सापडले!
या संशोधनातून असे समोर आले आहे की श्वेत बटू तारे केवळ पांढरे नसतात, तर त्यांच्या रासायनिक रचनेनुसार ते इतर रंगांतही चमकू शकतात. ज्या श्वेत बटू ताऱ्यांमध्ये कार्बनचे प्रमाण जास्त असते, ते बहुतेक गुलाबी किंवा जांभळट दिसतात. धूमकेतू आणि लघुग्रहांचे अवशेष शोषून घेतलेले तारे पिवळसर दिसतात. हायड्रोजन आणि हिलियम असलेले थंड श्वेत बटू या रंगात आढळतात. तसेच, याच अभ्यासात आजपर्यंतचा सर्वात लाल असल्याचा अंदाज असलेला डब्ल्यूडी जे१०११+२८४५ नावाचा आणखी एक श्वेत बटू सापडला आहे, जो पृथ्वीपासून केवळ ४८ प्रकाशवर्षांवर आहे.
या ताऱ्यातून बाहेर पडणाऱ्या कार्बनमुळे त्याचा प्रकाश लांब तरंग लांबीकडे सरकला असून, तो गडद सॅल्मन-गुलाबी रंगाचा दिसतो. संशोधकांनी पृथ्वीपासून जवळ असलेल्या ६५ प्रकाशवर्षांच्या क्षेत्रातील १५१ श्वेत बटूंचा अभ्यास केला. त्यात ५ तारे असामान्य रंगाचे आढळले (दोन पिवळे आणि तीन गुलाबी). यावरून शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, वश्विातील दर ३० पैकी सुमारे एक श्वेत बटू अशा असामान्य रंगाचा असू शकतो. मात्र, आजही बहुतांश श्वेत बटू पांढरेच दिसतात.
संशोधनाचे नवे अवकाश खुले होणार
हा शोध खगोलशास्त्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यावरून हे सिद्ध होते की ताऱ्याचा रंग केवळ त्याच्या तापमानावरच नव्हे, तर त्याच्या वातावरणातील रसायनांवरही अवलंबून असतो. तसेच, श्वेत बटूंच्या वातावरणातील या पदार्थांचा अभ्यास करून त्यांच्या जुन्या काळातील खडकाळ ग्रहांची रचना कशी होती, हे समजून घेणे संशोधकांना शक्य होणार आहे.
Read About : Google Earth AI : नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलांचा आधीच मिळणार अंदाज
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.