Ad Advertisement Ad Advertisement

Houthi rebels attack Saudi Arabia – सौदीचे विमानतळ, तेल प्रकल्पावर हौथी बंडखोरांचे हल्ले

एका भारतीयासह तिघांचा मृत्यू, १० जखमी

Houthi rebels attack Saudi Arabia : रियाध : इराणचे पाठबळ असलेले हौथी बंडखोर आणि सौदी अरेबिया यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियात बुधवारी उशिरा रात्री दम्माम विमानतळावर आणि एका तेल प्रकल्पावर हल्ला केला. यात एका भारतीयासह ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ३ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. मागील १६ दिवसांत या विमानतळांवर ६ मोठे हल्ले करण्यात आले आहेत. सौदीवरील या हल्ल्यांचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.


सौदी अरेबियातील दम्माम शहराच्या किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. तर, दोन भारतीय नागरिकांसह ८ जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, अरामकोच्या तेल प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात नेपाळ आणि फिलिपिन्सच्या प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाला असून, येथे एका भारतीयासह २ जण जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सौदी अरेबियाच्या दम्माम विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर आकाशात धुराचे लोट उठताना दिसले. सौदी अरेबियाच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने गुरुवारी विमानतळावरील हल्ल्याची माहिती दिली. या हल्ल्यात विमानतळाचेही नुकसान झाले आहे. दम्माम हे शहर पर्शियन आखाताच्या किनारपट्टीवर वसलेले आहे. हे बहरिन आणि कतारच्या जवळ आहे. या ताज्या हल्ल्यानंतर अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, असे जगभरातील उड्डाणांवर नजर ठेवणारी वेबसाइट ‘फ्लरटारडार२४’ने सांगितले.

दरम्यान, चालू ऑक्टोबर महिन्यात हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर ६ मोठे हल्ले केले. यात किमान २३ लोकांचा मृत्यू झाला असून, ३७० जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या काही राजनैतिक अधिकाऱ्यांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसह सौदी अरेबिया सोडण्यास सांगितले आहे.

सौदीवरील चालू महिन्यातील ६ मोठे हल्ले

६ ऑक्टोबर : जाजान आणि नजरानच्या विमानतळांना लक्ष्य करण्यात आले. तसेच डागलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सौदी हवाई संरक्षण प्रणालीने रोखले.
७ ऑक्टोबर : रियाध आणि आभा विमानतळावर हल्ले झाले. यात तीन विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आणि ३६ जण जखमी झाले.
८ ऑक्टोबर : रियाध विमानतळावर आणखी एक हल्ला झाला. यात सौदीच्या ३ नागरिकांचा मृत्यू झाला व एका विमानाचे नुकसान झाले.
१० ऑक्टोबर : रियाध विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय नागरिकासह १३ लोकांचा मृत्यू झाला. तर, ३०० हून अधिक जण जखमी झाले.
११ ऑक्टोबर : रियाध विमानतळावर एक क्षेपणास्त्र किंवा ड्रोन कोसळले. यात एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले.
२२ ऑक्टोबर : दम्माम विमानतळावर आणि एका तेल प्रकल्पावर हल्ला झाला. यात यात एका भारतीयासह ३ लोकांचा मृत्यू झाला.

Read About : Chhatrapati Sambhajinagar Murder : आधी कारची जोरदार धडक, नंतर रॉडने वार; एन-7 सिडको भागात भरदिवसा व्यावसायिक वादातून मित्राचा क्रूर खून

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.