Kerala Elephant Clinics : गळ्यात स्टेथॉस्कोप अडकवलेले डॉक्टर्स, आजूबाजूला एक्स-रे किंवा एमआरआय मशीन, हॉस्पिटलचे कपडे घालून बेडवर झोपलेले रुग्ण, औषधपाणी करणाऱ्या परिचारिका, मेडिकल स्टोअरमधली गर्दी, काळजीत असलेले नातेवाईक असं दृश्य कुठल्याही हॉस्पिटलमध्ये दिसतं; पण हत्तींच्या क्लिनिकमध्ये काय चित्र असेल बरं? ते यापेक्षा वेगळं असेल हे नक्कीच; पण आपण सहसा त्याची कल्पनाच करू शकणार नाही.
हत्तींच्या दवाखान्यात स्टेथॉस्कोप चालत नाही; तर तिथं हायड्रॉलिक क्रेन लागते! पाच हजार किलो वजनाच्या या ‘रुग्णां’ना तपासणीसाठी कूस बदलून झोपवायचं असेल तर तिथं अवाढव्य क्रेन आणि बेल्टस्चा वापर करावा लागतो. दातदुखी झाली की आपण थेट डेंटिस्टकडं जातो आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिथल्या खुर्चीवर बसून ‘आ’ करतो. छोटीछोटी साधनं वापरून डॉक्टर दातांंची तपासणी करतात. अगदी दात काढायलाही त्यांना छोटा चिमटा पुरतो; मात्र हत्तींचे सुळे किंवा दात प्रचंड मोठे असतात. हत्तींंच्या क्लिनिकमध्ये जेव्हा त्यांचं ‘रूट कॅनाल’ किंवा दातांचं ऑपरेशन केलं जातं, तेव्हा डॉक्टर चक्क पॉवर ड्रिल्स आणि करवती घेऊन येतात.
हत्तीचं तोंड उघडं ठेवण्यासाठी त्यांना लाकडाचे मोठे ठोकळे वापरावे लागतात. हाडांचे किंवा सांध्यांचे आजार झाले की आपण फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये जातो आणि एसी केबिनमध्ये गरम शेक घेेतला की आपल्याला आराम वाटतो. हत्तींना उतारवयात सांधेदुखी सतावू लागते, तेव्हा त्यांंच्यासाठी आधुनिक हत्ती क्लिनिकमध्ये ‘हायड्रोथेरपी पूल’ असतात. हत्तीला पाण्याच्या मोठ्या तलावात सोडलं जातं आणि तिथला पाण्याचा दाब त्याच्या सांध्यांचं दुखणं कमी करतो.
शिवाय हत्तींना मोठ्या लेझर गननं ‘लेझर थेरपी’ही दिली जाते. नखांना चमक देण्यासाठी आणि पाय मऊ करण्यासाठी आपण पेडिक्युअर करून घेतो; मात्र हत्तींसाठी पेडिक्युुअर हे सौंदर्य खुलवण्यासाठी नसतं! खरं तर ती त्यांची ‘लाईफ लाईन’ असते. डांबरी रस्त्यावर चालून हत्तींच्या तळपायांना जखमा होतात, त्यांत खडे आणि खिळे रुततात. अशा वेळी हत्तीच्या दवाखान्यात विशेष सुऱ्या आणि कटर वापरून हत्तींंची नखं घासली जातात. हे पेडिक्युुअर वेळेवर झालं नाही, तर संसर्ग होऊन हत्ती दगावूही शकतो.
हे सगळं सांगायचं कारण म्हणजे, केरळमध्ये सध्या हत्तींंसाठी ठिकठिकाणी अशी वैद्यकीय शिबिरं सुरू आहेत. हत्तींचं रक्त, लघवी आणि शेणाचे नमुने घेऊन मधुमेह, कोलेस्ट्रॉल, किडनी आणि लिव्हरच्या आजारांची तपासणी त्यांत होत आहे; तसंच प्रत्येक हत्तीचं स्वतंत्र ‘हेल्थ कार्ड’ही तयार केलं जात आहे. ही एक नियमित सरकारी मोहीम वाटू शकते; परंतु या मोहिमेला सर्वोच्च न्यायालयाचा तीव्र रोष, मंदिरांमधल्या हत्तींंचा होणारा छळ आणि हत्तींच्या घटत्या संख्येची एक चिंताजनक पार्श्वभूमी आहे. या शिबिरांची सुरुवात होण्याचं मुख्य कारण ठरली ती सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली एक याचिका.
केरळमधला सर्वांत उंच पाळीव हत्ती उत्तोली रमण याच्या मालकी हक्काचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. जून २०२६ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं या हत्तीचा गैरवापर रोखण्यासाठी त्याचा ताबा केरळ सरकारकडं सोपवण्याचे आणि त्याला योग्य पुनर्वसन केंद्रात हलवण्याचे निर्देश दिले होते; मात्र काही महिन्यांनंतरही सरकारनं त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली नाही. त्यावरून पुुढल्या सुनावणीच्या वेळी खंडपीठानं सरकारला तीव्र शब्दांत फटकारलं. त्यानंतर सरकारनं घाईघाईनं हत्तींंसाठी विशेष वैद्यकीय तपासणी शिबिरं आणि दवाखाने सुरू करण्याची मोहीम हाती घेतली.
केरळमधल्या त्रिशूर पूरमसारख्या भव्य उत्सवांमध्ये हत्ती हे आकर्षणाचं केंद्र असतात. परंतु, या झगमगाटामागं हत्तींचा अनन्वित छळ लपलेला असतो. देवस्थानांकडं आणि खासगी मालकांकडं असलेल्या हत्तींना तासनतास साखळदंडानं बांधून ठेवणं, उष्णतेत डांबरी रस्त्यावरून चालवणं, फटाक्यांच्या आवाजात उभं करणं असे गंभीर प्रकार उत्सवांंदरम्यान होतात.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या देशातल्या पहिल्या डीएनए आधारित हत्तींच्या गणनेच्या अहवालानुसार, केरळमधल्या हत्तींच्या संख्येत मोठी घट झाली आहे. २०१६-१७ च्या सुमारास सुमारे ५,७०० ते ६,२०० जंगली हत्ती असल्याचा अंदाज होता; परंतु आता त्यांची संख्या २,७८५ वर आली आहे. पाळीव किंवा बंदिस्त हत्तींची संख्या २०१८ मध्ये ५२१ होती, ती आता ३८८ वर आली आहे. रोगराई, रेल्वे अपघात आणि अपुरी देखभाल यांमुळं हत्तींची संख्या कमी होत जाणं हे पर्यावरण आणि वन्यजीव साखळीसाठी चिंताजनक आहे.
या संकटाच्या काळात आशेचा एक किरण म्हणून रिलायन्स फाउंडेशनचे संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधल्या मंदिरांच्या आणि हत्ती संवर्धनाच्या पायाभूत सुविधांसाठी १८ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. जामनगर इथल्या त्यांच्या ‘वनतारा’ या प्राणिकल्याण मोहिमेअंतर्गत हा पुढाकार घेण्यात आला आहे. या निधीतले सहा कोटी प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिर आणि राजराजेश्वरम मंदिराला देण्यात आले आहेत. विशेषत: गुरुवायूर इथल्या हत्तींसाठी अद्ययावत हत्ती रुग्णालय, साखळदंडाशिवाय राहण्यासाठी खुली घरं आणि आधुनिक वैज्ञानिक वैद्यकीय सुविधा उभारण्यासाठी या देणगीचा वापर केला जाणार आहे. साखळदंडांतून हत्तींची सुटका करण्यासाठी ही मदत मैलाचा दगड ठरू शकते.
मल्हार अरणकल्ले
arankalle.malhar@gmail.com
Read About : Florida Shipwreck Treasure : फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरचा खजिना
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.