१७,००० फूट उंचीवरून हटवला ८ टन प्लास्टिक कचरा
Ladakh Ghost Temple Plastic Cleanup : शिमला : एका स्वयंसेवी संस्थेने लडाखमधील मनाली-लेह राष्ट्रीय महामार्गावरील १७,००० फूट उंचीवर असलेल्या प्रसिद्ध ‘घोस्ट टेम्पल’ परिसरातून तब्बल ८ टन प्लास्टिक कचरा यशस्वीपणे हटवला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला येथील ‘उरूज म्युझिक फाऊंडेशन’च्या ८ सदस्यांच्या पथकाने १३ ते १५ ऑक्टोबरदरम्यान उणे तापमानात आणि अत्यंत खडतर भौगोलिक परिस्थितीत ही तीन दिवसीय स्वच्छता मोहीम राबवली.
या विशिष्ट भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा आणि प्रामुख्याने पाण्याच्या बाटल्या जमा होण्यामागे एक २५ वर्षे जुनी स्थानिक लोककथा कारणीभूत आहे. या कथेनुसार, २५ वर्षांपूर्वी या ठिकाणी एका ट्रकचालकाचा साहाय्यक (क्लीनर) कडाक्याची थंडी आणि तहान लागल्यामुळे मरण पावला होता.
ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे चालक मदत आणण्यासाठी साहाय्यकाला गाडीतच सोडून गेला होता. या घटनेनंतर या ठिकाणी ‘घोस्ट टेम्पल’ अस्तित्वात आले. तेव्हापासून येथे येणारे प्रवासी त्या क्लीनरच्या मृत आत्म्याच्या शांतीसाठी आणि तहान भागवण्यासाठी पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या अर्पण करू लागले. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा साचला होता.
प्लास्टिक नव्हे, पाणी अर्पण करा
या मोहिमेत कचरा गोळा करण्यापेक्षा तो एवढ्या उंचावरून वाहून नेणे आणि पुनर्वापर केंद्रापर्यंत पोहोचवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. यासाठी लष्कर आणि सीमा रस्ते संघटनेच्या जवानांनी सहकार्य केले. मोहीम फत्ते केल्यानंतर संस्थेने तिथे हाताने रंगवलेला एक फलक लावला आहे. त्यावर या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक ट्रकचालक, बाईकस्वार आणि पर्यटकाला ‘डोंगरावर प्लास्टिक नव्हे, तर पाणी अर्पण करा’ असे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.
Read About : Google Earth AI : नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलांचा आधीच मिळणार अंदाज
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.