चीन : १,३३२ संघांचा सहभाग, गुरुवारी पारितोषिक वितरण
बीजिंग : Medical AI Imaging Competition – वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर किती वेगाने वाढत आहे, याचे ठळक उदाहरण नुकतेच चीनमध्ये पाहायला मिळाले. दक्षिण चीनमधील गुआंग्शी प्रांताची राजधानी नाननिंग येथे २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी वैद्यकीय प्रतिमांचे विश्लेषण करणाऱ्या एआय साधनांची राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सेकंड एफिलिएटेड हॉस्पिटल ऑफ गुआंगशी युनव्हिर्सिटी ऑफ चायनीज मेडिसिन’च्या टीमने प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेने जगाचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. १,३३२ संघांनी नोंदणी केली. चीनबरोबरच आग्नेय आशियातील (आसियान) देशांचे संघही होते. प्राथमिक फेऱ्यांनंतर ६६ संघ अंतिम फेरीत पोहोचले होते. पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (दि. पाच) आहे.
संशोधक, डॉक्टर आणि तंत्रज्ञान कंपन्या या निमित्ताने एकत्र आल्या. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा प्रशासनाने आणि गुआंग्शी सरकारने ही स्पर्धा संयुक्तपणे आयोजित केली होती. विजेत्या साधनांच्या पुढील विकासासाठी गुआंग्शीने दहा अब्ज युआनचा (सुमारे १.४५ अब्ज डॉलर) निधी उभारण्याची घोषणा केली होती. यापूर्वी याच प्रांताने भरवलेल्या एआय सुपर लीग स्पर्धेत दहा हजारांहून अधिक संघ सहभागी झाले होते
विविध गटांत चाचणी
स्पर्धेचा मुख्य उद्देश होता, आजार लवकर आणि अचूक ओळखण्यासाठी डॉक्टरांना मदत करणारी एआय साधने तपासणे. फुफ्फुसाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, मूत्रपिंड, प्रोस्टेट आणि थायरॉईडचे आजार अशा विविध गटांत ही चाचणी झाली. सीटी स्कॅन, एमआरआय किंवा मॅमोग्राफीसारख्या तपासण्यांतील प्रतिमा पाहून आजाराची लक्षणे शोधणे हे या साधनांचे काम आहे. मोठ्या रुग्णालयांत डॉक्टरांना रोज शेकडो प्रतिमा पाहाव्या लागतात. थकव्यामुळे एखादी लहान खूण नजरेतून सुटू शकते. एआय अशावेळी दुसऱ्या डोळ्यासारखे काम करते आणि संशयास्पद भाग डॉक्टरांच्या लक्षात आणून देते. त्यामुळे निदान लवकर होऊन उपचारही वेळेत सुरू होऊ शकतात. या स्पर्धेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासलेली आणि खुणा केलेली प्रतिमांची माहिती संघांना देण्यात आली होती.
सीमापार चाचण्यांची योजना
चीन वैद्यकीय प्रतिमांचे ‘क्लाउड’ जाळेही उभारत आहे, जेणेकरून रुग्णालयांना एकमेकांच्या प्रतिमा सहज पाहता येतील. स्पर्धेनंतर गुआंग्शी प्रांताने आता आसियान देशांसोबत अशा एआय साधनांच्या सीमापार चाचण्या घेण्याची योजना आखली आहे.
Read About : Robot Dog Walking Job : रोबोट डॉग फिरवण्यासाठी मिळणार तासाला 1,700 रुपये; सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अनोखी नोकरी !
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.