९२.२० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; जलद निकालामुळे निवासी डॉक्टरांना मोठा दिलासा
छत्रपती संभाजीनगर: Muhs Md Ms Medical Pg Result – विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वेळ वाचविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हिवाळी-२०२६ मधील पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी. आणि एम.एस. अभ्यासक्रमांचा निकाल परीक्षा संपल्यानंतर अवघ्या चार दिवसांत जाहीर करून विद्यापीठाने वेगवान निकाल प्रक्रियेचा आदर्श निर्माण केला आहे. या परीक्षेत तब्बल ९२.२० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या या तत्परतेमुळे निवासी डॉक्टरांना पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रक्रियांसाठी वेळेत पात्र ठरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हिवाळी-२०२६ मध्ये पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या २८ अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ हजार ३९९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ९२.२० टक्के विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. निकाल प्रक्रिया पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी निकालाचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. त्यांचे पुढील शिक्षण, प्रशिक्षण आणि व्यावसायिक वाटचाल वेळेत सुरू होण्यासाठी निकाल प्रक्रिया जलद होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. उत्तरपत्रिकांचे संगणक प्रणालीद्वारे स्कॅनिंग करून ऑनलाइन पद्धतीने तपासणी करण्यात येत असल्याने निकाल जाहीर करण्याचा कालावधी कमी करणे शक्य झाले आहे. यामुळे वेळ आणि आर्थिक बचतही होत आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत आणि यशासाठी केलेले प्रयत्न यांना योग्य वेळी न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे. डिजिटल प्रक्रियेमुळे निकालाचे काम अधिक जलद आणि कार्यक्षमतेने करणे शक्य झाले आहे.
विशेष कार्यपध्दती विकसित
परीक्षा आणि निकाल प्रक्रिया नियोजनबद्धरीत्या तसेच निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष कार्यपद्धती विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार परीक्षेचे नियोजन, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा वेळ वाचविणारी, तंत्रज्ञानाची जोड देणारी आणि शैक्षणिक प्रक्रियेला गती देणारी विद्यापीठाची ही कार्यपद्धती वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी निश्चितच दिलासादायक ठरत असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले.
Read About : District Hospital Advanced X-Ray – जिल्हा रुग्णालयात 30 लाखांचे अत्याधुनिक एक्सरे मशीन
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.