Ad Advertisement Ad Advertisement

ST Bus Fare Hike – एसटीची प्रस्तावित १५ टक्के भाडेवाढ रद्द

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा प्रस्तावाला नकार

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळाची दिवाळी हंगामातील प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी फेटाळून लावली. त्यामुळे १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रस्तावित असलेली भाडेवाढ लागू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिवाळीच्या गर्दीच्या काळात दरवर्षी एसटीच्या प्रवासी भाड्यात हंगामी वाढ केली जाते. त्यानुसार यंदाही एसटी प्रशासनाने १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, दुष्काळामुळे अडचणीत सापडलेले शेतकरी, महागाईने त्रस्त असलेले नागरिक आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आर्थिक ओढाताण सहन करणाऱ्या प्रवाशांवर अतिरिक्त भार टाकणे योग्य नसल्याचे सांगत सरनाईक यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला. एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात असले, तरी त्याची भरपाई सर्वसामान्य प्रवाशांकडून करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीची लालपरी हा परवडणाऱ्या प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे भाडेवाढीचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन खर्चावर झाला असता. संकटाच्या काळात जनतेच्या खिशाला हात घालण्यापेक्षा तिला दिलासा देणे महत्त्वाचे आहे. एसटीच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधले जातील मात्र सर्वसामान्यांवर अतिरिक्त भार टाकणार नाही, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Read About : Transgender Toilets at ST Bus Stations बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.