Ad Advertisement Ad Advertisement

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana Maharashtra – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा

सात हजार मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana Maharashtra छत्रपती संभाजीनगर : एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी झाल्याचा परिणाम म्हणून ऑक्टोबर महिन्यात अभूतपूर्व उष्णता जाणवत आहे. मुंबईसह राज्यात १० ऑक्टोबर रोजी आतापर्यंतची सर्वाधिक ३८,०२१ मेगावॅट विजेची मागणी नोंदविली गेली असून उच्चदाब वीज प्रणालीतून ३२,९२१ मेगावॅट आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत सौर प्रकल्प व प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ५१०० मेगावॅट वीज उपलब्ध झाल्याने उच्चांकी वीज मागणी पूर्ण करण्यात आली. सौर ऊर्जा योजनांमुळे दिवसा वीज उपलब्ध होण्यासोबत वीजखरेदीतील बचतीचा लाभ होत आहे.

मुख्यमंर्त्यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले की, दुष्काळी परिस्थितीत राज्यात उन्हाच्या झळा जाणवत आहेत. विजेची मागणी प्रचंड वाढली असताना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेचा मोठा लाभ झाला आहे. त्यासोबत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून राज्यात छतांवर उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचाही लाभ झाला आहे.

या योजनांमुळे दिवसा वीज मागणी वाढलेली असताना विजेची उपलब्धता आणि वीज खरेदीतील मोठी बचत असा दुहेरी दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्व ४८ लाख कृषी पंप सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत एकूण १६, ००० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत सात हजार मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सध्या या योजनेमुळे व काही तांत्रिक उपायांचा अवलंब करून ८० टक्के कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे १० ऑक्टोबर या उच्चांकी मागणीच्या दिवशी सर्वाधिक ५५०० मेगावॅट वीज पुरवठा दुपारी बारा वाजताच्या सुमारास झाला. सौरऊर्जा प्रकल्पात सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार वीजनिर्मिती बदलत असते. त्यातून होणाऱ्या वीजनिर्मितीमुळे दिवसा वीजमागणी मोठ्या प्रमाणावर असताना राज्याला दिलासा मिळत आहे.—

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे तिहेरी लाभ

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे दिवसभरात मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतीसाठी रात्रीच्या ऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्यात येत आहे. या योजनेत सरासरी ३ रुपये ९ पैसे प्रती युनिट इतक्या कमी दराने वीज उपलब्ध होत असल्याने रात्रीची महाग वीज विकत घ्यावी लागत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीजखरेदीत बचत होत आहे.

सप्टेंबर महिन्यात या योजनेतून ८७८ दशलक्ष युनिट वीज उपलब्ध झाली. रात्रीचा शेतीपंपाचा २५०० मेगावॅट इतका भार दिवसा वळविल्यामुळे कमाल वीजदराच्या तुलनेत वीजखरेदीचे ३८४ कोटी रुपये वाचले. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, वीज पुरवठा व्यवस्थापनाला मोलाची मदत आणि वीजखरेदीच्या पैशाची बचत असा तिहेरी लाभ होत आहे.

Read About : Honey Singh Summons – हनी सिंगच्या अडचणी वाढणार? १६ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.