Ad Advertisement Ad Advertisement

Manoj Jarange audio clip controversy- जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब

मला उद्ध्वस्त करण्यासाठी पाचशे कोटी रुपये दिले!; मनोज जरांगे यांचा आरोप : पत्रकार परिषदेत ऐकवली ऑडिओ क्लिप

Manoj Jarange audio clip controversy- वडीगोद्री : गेल्या तीन वर्षांपासून माझ्याविरुद्ध कटकारस्थान सातत्याने सुरू आहे. मला उद्ध्वस्त करण्यासाठी पाचशे कोटी रुपये दिल्याचे ऑडिओ क्लिपमधील संवादावरून स्पष्ट होते. आता ही ऑडिओ क्लिप खरी आहे किंवा खोटी यामागील सत्य सरकारने शोधावे. माझ्याविरोधात रान उठवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी बोलणाऱ्या लोकांना आवरावे नसता हे तुमचेच षड्यंत्र होते, असा आमचा समज होईल. मग मात्र मराठा समाज सन २०२९ च्या निवडणुकांमध्ये तुमच्या मागे राहणार नाही, असा इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

२० ऑक्टोबर रोजी झालेल्या दसरा मेळाव्यात जरांगे-पाटलांनी मला उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपने खा. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत पाचशे कोटी रुपये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. जरांगे-पाटलांच्या आरोपानंतर शिंदे व रामदास कदम यांनी पुरावे द्या मगच बोला, असे आव्हान दिले होते. त्यावर जरांगे-पाटील यांनी गुरुवारी अंकुशनगर येथे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन ऑडिओ क्लिप ऐकवून कसे षड्यंत्र रचले गेले याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

मोबाईलवरून ऐकवलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या वर्तुळातील व्यक्तींचे संभाषण असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच शिंदे साहेब, माझ्याविरोधात गेल्या वर्षापासून जे बोलले जात आहे, त्यात ७० टक्के लोकांच्या मागे तुमचाच हात आहे. तुम्ही कोणाच्या उपसमितीच्या बैठका घेता आणि तुमचा कोणता मंत्री काय सांगतो? हेही मला चांगलेच माहिती आहे, असेही ते म्हणाले.

क्लिपमध्ये महिलेचे संभाषण

ऑडिओ क्लिपमध्ये एका महिलेचाही आवाज येत असून ‘जरांगे-पाटील को ऑलरेडी ५०० करोड रुपये श्रीकांत शिंदे के पाससे पहुंच चुके है. अब जरांगे-पाटील विधानसभा चुनाव में हमारे फायदे का रहेगा या नहीं, इसमें मेरा मत अलग है, कॅल्क्युलेशन अलग है… बाकी आप लोग जो सोचते हैं…’ असे ही महिला बोलत आहे. जरांगे-पाटलांचा मराठा समाजातील वाढता प्रभाव कमी करण्यासाठी भाजपमधील मराठा नेत्यांना पुढे करण्याबाबत या संभाषणात चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

तर ओबीसी, मुस्लिमही जवळ करणार नाही

मी एक-दोन महिन्यांत इतका मोठा विषय काढणार आहे की, त्यात तुम्ही कुणीच पाय धरणार नाही. एवढे भयानक षड्यंत्र का रचले जात आहे, याचा शोध पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांनी तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा. मी जर दुसरा अणुबॉम्ब तुमच्यावर टाकला तर ओबीसी, मुस्लिम कुणीही तुम्हाला जवळ करणार नाही, असे सांगत जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांना इशाराही दिला. हे लोक कोण हे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शोधावेत, शोधण्याचे काम आमचे नाही, हे पक्षांचे नेटवर्क चालवणारे लोक आहेत. माझी बदनामी का केली हे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या ऑडिओतील महिलेला विचारले पाहिजे. एवढे षड्यंत्र म्हटल्यावर आम्ही घराबाहेर कसे पडायचे? तीन वर्षांपासून हेच सुरू असल्याचा दावा जरांगे-पाटलांनी यावेळी केला.

जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करा – उदय सामंत

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून त्यातील संभाषणाची सत्यता तपासावी. या क्लिपमधील आवाजांची फॉरेन्सिक तपासणी करावी, तसेच पोलीस, सायबर यंत्रणा आणि विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मराठा समाजातील प्रतिमा मलीन करण्याचा आणि शिवसेना व भाजपमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रकरणातून होत आहे का, याचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.


मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना सामंत म्हणाले, या ऑडिओ क्लिपमध्ये भाजप संबंधित काही व्यक्तींची नावे असून यात आंदोलन थांबवणे, आंदोलनकर्त्यांना बाजूला करणे, वाहनांची व्यवस्था आणि संबंधित यंत्रणांशी संपर्क साधण्याबाबतचे संभाषण असल्याचे सांगितले जात आहे. त्यात ५०० कोटी रुपयांचाही उल्लेख आहे. मात्र क्लिपमधील संभाषण खरे की खोटे, हे चौकशीतून स्पष्ट झाले पाहिजे. क्लिपमधील आवाज कोणाचे आहेत, रेकॉर्डिंग कोणी व कुठे केले आणि ती जरांगे यांच्यापर्यंत कशी पोहोचली, याचा उलगडा होणे आवश्यक आहे.

५०० कोटींच्या आरोपांवर बोलताना सामंत म्हणाले, मनोज जरांगे यांनी आपल्याला पैसे मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर एकनाथ शिंदे यांनीही आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे पैसे देणे-घेणे या मुद्द्यावरून वाद घालण्याऐवजी आता ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची सत्यता तपासली पाहिजे. या प्रकरणाचा वापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा किंवा मित्रपक्षांच्या नेत्यांबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला आहे का, हे जनतेसमोर आले पाहिजे. या क्लिपमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव आल्याने शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मराठा समाजात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत, त्यांचे नाव या संभाषणात का आले, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

Read About : SBI data leak- एसबीआयच्या 3,897 ग्राहकांची संवेदनशील माहिती डार्क वेबवर

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.