Ad Advertisement Ad Advertisement

Tilak Varma India vs New Zealand T20- भारताचा विजयी ‘तिलक’

नमन, नितिशसोबत निर्णायक फटकेबाजी
न्यूझीलंडला मात देत मालिकेत आघाडी

Tilak Varma India vs New Zealand T20 : क्राइस्टचर्च : उपकर्णधार तिलक वर्माच्या (२६ चेंडूंत नाबाद ५१, ६ चौकार, १ षटकार) पदाला साजेशी अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाने टी-२० मालिकेतील दुसऱ्या लढतीमध्ये न्यूझीलंडवर ४ गडी व १ चेंडू राखून रोमहर्षक विजय मिळवला.न्यूझीलंडला ५ बाद १८० धावांवर रोखल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने निम्मा संघ ११ षटकांमध्ये ७० धावांमध्ये गमवला. या परिस्थितीत पराभव निश्चित मानला जाता होता. मात्र, डावखुऱ्या तिलकने नमन धीर व नितीश कुमार रेड्डीसोबत निर्णायक फटकेबाजी करत भारताच्या माथी विजयाचा ‘टिळा’ लावला. सलग दुसऱ्या विजयामुळे भारतीय संघ ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेण्यात यशस्वी ठरला.

सलामीच्या सामन्यातील भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला सलामीवीर संजू सॅमसन १ चौकार, १ षटकारने १४ धावा काढून परतला. जायबंदी इशान किशनच्या स्थानावर तिसऱ्या क्रमांकावर उतरलेला १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने (४) निराशा केली. अभिषेक शर्माने २१ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकारने २७ धावा काढत पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने ११ व्या षटकात भारताला दुहेरी धक्के दिले. कर्णधार श्रेयस अय्यरच्या (७) यष्ट्या उद्ध्वस्त केल्यानंतर त्याने अक्षर पटेलला (११ धावा) झेल बाद करण्यात यश मिळवले. अक्षर बाद झाल्यामुळे भारतीय फलंदाजांवरील दबाव वाढला, पण टी-२० मध्ये फटकेबाजी करण्यात माहिर असलेल्या तिलकने दडपण मनावर घेतले नाही.

गत सामन्यातील फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या नमननेही त्याला तोलामोलाची साथ दिली. नमनने गोलंदाजीतील अपयश फलंदाजीत भरून काढत १७ चेंडूंत १ चौकार, ३ षटकारांनी ३१ धावा फटकावल्या. तिलक-नमनने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना लक्ष्य करत सहाव्या गड्यासाठी २४ चेंडूंत ४२ धावांची भागीदारी रचली. नमन बाद झाल्यानंतर तिलकने अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीसोबत अखेरच्या षटकांमध्ये लय कायम ठेवली. हैदराबादच्या या जोडीने ३० चेंडूंमध्ये अभेद्य ६९ धावांच्या भागीदारीने विजयावर शिक्कामोर्तब केले. रेड्डीने त्याला चांगली साथ देत १३ चेंडूंत १ चौकार, १ षटकारने नाबाद २६ धावा काढल्या.

तत्पूर्वी, फलंदाजीसाठी निमंत्रित करण्यात आलेल्या यजमान संघाच्या प्रमुख फलंदाजांना रोखण्यात भारताचे गोलंदाज यशस्वी ठरले. टिम सायफर्ट (७), फिन ॲलन (१६) आणि डॅरेल मिचेल (६) असे पहिले तीन फलंदाज पॉवरप्लेमध्ये बाद झाले. मात्र, त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि बेव्हॉन जेकब्स या नवोदित फलंदाजाने भारतीय गोलंदाजांना आणखी यश मिळवू दिले नाही. जेक्बसने ४६ चेंडूंत ५ चौकार, १ षटकारने ५८ धावा काढल्या, तर फिलिप्सने ४३ चेंडूंत ४ चौकार, ४ षटकारांनी ७० धावांची खेळी सजवली. भारताकडून अर्शदीप सिंगने प्रभावी मारा करत सर्वाधिक २ बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमार व प्रिन्स यादव या दुकलीने प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडले.

६९ धावांची अभेद्य भागीदारी
  • तिलक-नितीश यांनी ६९ धावांची अभेद्य भागीदारी विक्रमी ठरली. कारण, भारताकडून सातव्या किंवा त्या खालील क्रमांकावर टी-२० प्रकारात उभारण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वोच्च भागीदारी आहे.
  • तिलकने परिस्थितीशी जुळवून घेताना पहिल्या १३ चेंडूंत १७ धावा काढल्या आणि त्यानंतर जम बसल्यानंतर पुढील १३ चेंडूंत ३४ धावांची लयलूट केली.
पारडे भारताच्या बाजूने फिरवले

११ षटकांमध्ये ५ बाद ७० अश्या अवघड परिस्थितीनंतर तिलक (नाबाद ५१), नमन (३१) आणि नितिश (नाबाद २६) यांनी प्रसंगवधान राखत सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने फिरवले.

आम्ही १८ व्या षटकातच जिंकलो असतो

मी नमनला सांगितले होते की, जेव्हा फिरकीपटू गोलंदाजी करतील, तेव्हा आपण आक्रमक खेळूया. दुर्दैवाने, मिचेलच्या अंतिम षटकात नमन बाद झाला; अन्यथा, आम्ही १८ व्या षटकातच सामना जिंकू शकलो असतो. त्यानंतर आम्ही हैदराबादचे खेळाडू एकत्र आलो. – तिलक वर्मा, सामनावीर.

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.