एका जवानाची प्रकृती गंभीर, हल्लेखोरांचे पलायन
श्रीनगर : CRPF jawans injured in Kulgam attack जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात बुधवारी दुपारी मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सुरक्षा दलाच्या एका तपासणी चौकीवर गोळीबार केला. या घटनेत केंद्रीय राखीव पोलीस दला (सीआरपीएफ) चे तीन जवान जखमी झाले आहेत. सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी कुलगाममधील एका चौकीवर तैनात असलेल्या जवानांवर गोळीबार केला. सीआरपीएफ जवानांवर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू असून जखमी जवानांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दुचाकीवरून आलेले हल्लेखोर म्हणजे दोन दहशतवादी होते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. हल्ला ज्या ठिकाणी झाला, तो मीर बाजार परिसर कडेकोट सुरक्षा असलेल्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे.
हा परिसर पीर पंजाल पर्वतरांगेच्या जवळ आहे, जी कुलगामला जम्मू विभागातील रामबन, रियासी आणि राजौरी जिल्ह्यांशी जोडते. या वर्षाच्या सुरुवातीला, ३१ जुलै रोजी कुलगाममधील एका वीटभट्टीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडमधील दोन मजूर ठार झाले होते. जुलै महिन्यातच, शेजारील अनंतनाग शहरात दहशतवाद्यांनी एका पोलिसाचीही गोळ्या झाडून हत्या केली होती.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, जखमी जवानांना उपचारांसाठी अनंतनाग येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त मोहीम सुरू केली आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, ती चौकी राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे ४ किमी अंतरावर आहे. जखमी तीन जवानांपैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर तिसऱ्या जवानाची प्रकृती काहीशी गंभीर आहे. जखमी जवानांची नावे हेड कॉन्स्टेबल सोमवीर सिंग आणि कॉन्स्टेबल राकेश दास व संतोष चंद्रू अशी आहेत.
पश्चिम बंगालचे रहिवासी असलेले संतोष चंद्रू यांच्या पोटात आणि पाठीच्या कण्याला दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती काहीशी गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. आसामचे रहिवासी असलेले कॉन्स्टेबल राकेश दास यांच्या पायाला गोळी लागली, तर मध्य प्रदेशचे रहिवासी असलेले हेड कॉन्स्टेबल सोमवीर सिंग यांच्या हाताला गोळी लागली आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे.
संपूर्ण परिसरात नाकेबंदी
हा हल्ला दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ‘मीर बाजार’ परिसरात झाला. हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले असून, संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे.
सुरक्षा दलाचे जवान तैनात
घटनास्थळावरील चित्रणात जखमी जवानांना स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेले जात असल्याचे आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांच्या मदतीसाठी धावताना दिसत आहेत. हल्ल्यानंतर लगेचच परिसरात अतिरिक्त बॅरिकेड्स लावण्यात आले. घटनास्थळाच्या आसपास चिलखती वाहनांमधून सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले असून, अतिरिक्त कुमकही पाठवण्यात आली आहे.
नायब राज्यपाल होते कुलगाममध्येच
परिसरात रुग्णवाहिकांचे सायरन वाजत होते आणि लाऊडस्पीकरवरून स्थानिक नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात होते. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे देखील कुलगाममध्येच होते, परंतु ते हल्ल्याच्या ठिकाणापासून दूर होते.
महत्वाचे मुद्दे
Read About : Agniveer Service Extension to Six years – अग्निवीर आता 4 नव्हे 6 वर्षे नोकरी करणार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.