Ad Advertisement Ad Advertisement

Jensen Huang Relationship Allegations – वरिष्ठ महिला अधिकाऱ्याशीही संबंध असल्याचा न्यूयॉर्क टाइम्सचा दावा

एनव्हिडियाच्या हेल्थकेअर विभागाच्या उपाध्यक्ष किंबर्ली पॉवेल यांच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप; कंपनीने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

न्यूयॉर्क : Jensen Huang Relationship Allegations जगातील आघाडीची एआय चिप उत्पादक कंपनी एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नवे आरोप समोर आले आहेत. कंपनीच्या आरोग्य सेवा विभागाच्या उपाध्यक्ष किंबर्ली पॉवेल यांच्याशी त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याआधी चीनसाठी हेरगिरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेल्या ॲलिस हुआंग यांच्याशीही जेन्सेन यांच्या संबंध चर्चेत आले होते.

या दोन्ही प्रकरणांमुळे कंपनीच्या अंतर्गत कारभारावर आणि कॉर्पोरेट नियमांच्या पालनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. न्यूयॉर्क टाइम्सने एनव्हिडियातील पाच कर्मचाऱ्यांच्या माहितीच्या आधारे हा दावा प्रसिद्ध केला आहे. त्यापैकी दोघांनी मार्चमध्ये सॅन जोस येथे झालेल्या कंपनीच्या परिषदेदरम्यान जेन्सेन हुआंग आणि किंबर्ली पॉवेल एका हॉटेलमध्ये जवळीक साधताना दिसल्याचा व्हिडीओ असल्याचे सांगितले. मात्र, संबंधित वृत्तपत्राने हा व्हिडीओ स्वत: पाहिलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

६३ वर्षीय जेन्सेन हुआंग आणि ४८ वर्षीय किंबर्ली पॉवेल हे दोघेही विवाहित आहेत. या आरोपांबाबत विचारणा केल्यानंतर हुआंग यांनी पत्रकाराशी थेट संवाद टाळत फोनवरील संभाषण संपवले. एनव्हिडियाने या वृत्तावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पॉवेल यांनीही तातडीने उत्तर दिले नसल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

कोण आहेत किंबर्ली पॉवेल?

पॉवेल २००८ पासून एनव्हिडियामध्ये कार्यरत असून सध्या कंपनीच्या आरोग्य सेवा विभागाच्या उपाध्यक्ष आहेत. वैद्यकीय इमेजिंग आणि आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. बोस्टन विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून शिक्षण पूर्ण केले. २०१६ मध्ये वरिष्ठ संचालक आणि २०१७ च्या अखेरीस उपाध्यक्षपदी त्यांची बढती झाली.

कंपनीच्या आचारसंहितेचीही चर्चा

एनव्हिडियाच्या आचारसंहितेनुसार, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे व्यावसायिक निर्णयांमध्ये हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. गैरवर्तनाच्या तक्रारींची चौकशी करण्याचीही तरतूद आहे. वृत्तानुसार, पॉवेल थेट हुआंग यांना रिपोर्ट करत होत्या. त्यामुळे आरोप सिद्ध झाल्यास कंपनीच्या नियमांच्या अंमलबजावणीचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो.

चीनशी संबंधित आरोपांमुळे आधीच चौकशी

जेन्सेन हुआंग यांनी १९९३ मध्ये एनव्हिडियाची सहस्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने एआय चिप क्षेत्रात जागतिक स्थान निर्माण केले. मात्र, अ­ॅलिस हुआंग यांच्याशी संबंधित कथित संपर्क आणि चीनच्या हेरगिरीच्या संशयामुळेही ते चर्चेत आले आहेत. या प्रकरणाची एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने वॅचटेल, लिप्टन, रोझेन अँड कॅट्झ या कायदा संस्थेच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू केली आहे. अमेरिकी प्रतिनिधीगृहातील तीन समित्यांच्या रिपब्लिकन नेत्यांनीही त्यांना बंद दाराआड स्पष्टीकरणासाठी बोलावल्याचे वृत्त आहे. चीननेही हेरगिरीचे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, पॉवेल यांच्याशी कथित संबंधांबाबतचे आरोप स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाहीत. कंपनी किंवा संबंधित व्यक्तींकडून अधिकृत स्पष्टीकरण आल्यानंतरच या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होऊ शकतील.

Read About : Lashkar Maritime Training Near Karachi – पाक समुद्र मार्गे भारतावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.