Ad Advertisement Ad Advertisement

Shaheen Bagh Arson Case – संभाजीनगरातील शाहीनबागेत थरार; व्यावसायिकाचे घर, 4 वाहने पेट्रोल ओतून पेटवली!

तीन दुचाकी थार जळाली : शेजाऱ्यांच्या सतर्कतेने ११ जणांचा जीव वाचला, सीसीटीव्हीतून बिंग फुटले

छत्रपती संभाजीनगर Shaheen Bagh Arson Case : शहरातील शाहीनबाग परिसरात एका प्लॉट व्यावसायिकाच्या घरावर आणि पार्किंगमधील वाहनांवर मध्यरात्री ज्वलनशील पदार्थ ओतून आग लावली. ही घटना मंगळवारी (दि. १०) पहाटे घडली. या आगीत तीन दुचाकी आणि एका थार जीपचे मोठे नुकसान झाले. शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणल्याने ११ जणांच्या कुटुंबियांचा जीव वाचला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, बेगमपुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जुबेर लाला (रा. आरेफ कॉलनी), इलियास खान अहमद खान, उमर खान इलियास खान (दोघे रा. रेल्वे स्टेशन परिसर) आणि आलम खान इलियास खान (रा. बिस्मिल्लाह कॉलनी, सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अबुल आला खुर्रम अली हाशमी (४६, रा. प्लॉट नं. ९ व १०, शाहीनबाग, दिलरस कॉलनीजवळ) यांनी फिर्याद दिली. हाशमी यांचा प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून ते कुटुंबीयांसह राहतात. सोमवारी (दि. ९) रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी आपल्या तीन दुचाकी तसेच थार जीप घराच्या कंपाऊंडमध्ये लॉक करून ठेवली होती.

घराभोवती धुराचे लोट

मंगळवारी मध्यरात्री २ ते २:३० वाजेच्या सुमारास अचानक आरडाओरड झाल्याने हाशमी यांना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, घराभोवती धुराचे लोट दिसले. घराची भिंत, कंपाऊंड, तिन्ही दुचाकी आणि थार जीप आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. शेजारी राहणारे वाहेद अली हाश्मी आणि बशीर कुरेशी यांनी तातडीने पाण्याची मोटर लावून नळीने पाणी ओतून आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. हाशमी कुटुंबानेही त्यांच्या मदतीने आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

तोंडाला रुमाल बांधून आला संशयित

डायल ११२ वर संपर्क करून या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तोंडाला रुमाल बांधलेला एक इसम घराच्या भिंतीवर व वाहनांवर ज्वलनशील पदार्थ ओतून आग लावून पळून जाताना दिसून आला. हाशमी यांनी याबाबत माहिती घेतली असता, जुबेर लाला याने ही आग लावल्याचे आणि इलियास खान, उमर खान व आलम खान हे या कटात सहभागी झाल्याचे समोर आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्दीकी करीत आहेत.

Read About : Diwali Celebration Away from Home – घरापासून दूर, पण मायेच्या घासाने दिवाळी गोड!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.