Ad Advertisement Ad Advertisement

Swachh Harit Vidyalaya – स्वच्छ व हरित विद्यालय मानांकनासाठी 8 शाळांची निवड होणार

४ हजार ३३ शाळांचे मूल्यांकन; ऑनलाइन व प्रत्यक्ष पडताळणी सुरू
ग्रामीण भागातील सहा, तर शहरी भागातील दोन शाळांना मिळणार संधी

छत्रपती संभाजीनगर: Swachh Harit Vidyalaya शाळांमध्ये स्वच्छता, आरोग्यदायी वातावरण, सुरक्षित पिण्याचे पाणी आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग’ उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ शाळांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ३३ शाळांनी या उपक्रमांतर्गत मूल्यांकनाची नोंद केली असून, सध्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून शाळांच्या सुविधांची ऑनलाइन माहिती आणि प्रत्यक्ष स्थिती यांची पडताळणी केली जात आहे. यामध्ये ग्रामीण भागातील सहा, तर शहरी भागातील दोन शाळांना राज्यस्तरावर आपले कौशल्य आणि गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.


शाळांमधील स्वच्छतेच्या सवयी रुजविणे, विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय मूल्यांकन आणि मानांकनासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शाळांचे मूल्यांकन, प्रत्यक्ष तपासणी आणि पात्र शाळांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणावर भर

या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध मूलभूत सुविधांची तपासणी केली जात आहे. त्यामध्ये सुरक्षित पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छतागृहांची स्वच्छता, हात धुण्याची व्यवस्था, मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन, ओला व सुका कचरा व्यवस्थापन, शाळेच्या परिसराची देखभाल, विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती, हरित उपक्रम आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनुकूल सुविधांचा समावेश आहे. शाळांनी ऑनलाइन पोर्टलवर नोंदविलेली माहिती, अपलोड केलेली छायाचित्रे, संबंधित कागदपत्रे आणि प्रत्यक्ष उपलब्ध सुविधा यांची पडताळणी करून गुणांकन निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री माहितीवर अवलंबून न राहता शाळांमधील सुविधांची प्रत्यक्ष स्थितीही तपासली जाणार आहे.

पर्यावरण संवर्धनाविषयी जाणिव निर्माण होईल

स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग उपक्रम हा शाळांमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाची संस्कृती रुजविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांच्या मूल्यांकनाची नोंद झाली असून, सध्या ऑनलाइन माहिती आणि प्रत्यक्ष उपलब्ध सुविधांची पडताळणी सुरू आहे. निर्धारित निकषांनुसार पारदर्शक पद्धतीने गुणांकन करून पात्र शाळांची निवड केली जाईल. जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. या प्रक्रियेमुळे शाळांमधील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जाणीव निर्माण होण्यास मदत होईल.
— अश्विनी लाठकर( शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग)

चार आणि पाच स्टार शाळांनाच राज्यस्तरावर संधी

जिल्हास्तरीय निवडीसाठी शाळांचे मूल्यांकन अहवाल, उपलब्ध सुविधा, छायाचित्रे, संबंधित पुरावे आणि अभिलेख तपासले जाणार आहेत. किमान तीन स्टार मानांकन मिळविणाऱ्या आणि संबंधित गटात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या शाळांचा जिल्हास्तरीय निवडीसाठी विचार केला जाणार आहे. मात्र, राज्यस्तरीय नामांकनासाठी केवळ चार आणि पाच स्टार मानांकन प्राप्त शाळाच पात्र ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. स्वच्छता, आरोग्यविषयक सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाच्या निकषांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांना राज्यस्तरावर आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळणार आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणार

जिल्हास्तरावरील मूल्यांकन, ऑनलाइन व ऑफलाइन पडताळणी आणि मानांकनाची प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर निवड झालेल्या आठ शाळांचे राज्यस्तरीय नामांकन १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन पोर्टलवर सादर केले जाणार आहे. या उपक्रमामुळे शाळांमध्ये स्वच्छतेच्या सवयी विकसित होण्यासोबतच आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरणनिर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता वाढविण्यास आणि शाळांचा शैक्षणिक परिसर अधिक आरोग्यदायी व पर्यावरणपूरक बनविण्यास मदत होणार आहे.

Read About : MPhil BARTI Fellowship PhD Admission एम.फिल; बार्टी फेलोशिपवर थेट पीएच.डी. प्रवेशाचा हक्क नाही
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.