Ad Advertisement Ad Advertisement

NVIDIA CEO Jensen Huang Investigation – जेन्सेन हुआंग यांची पदावरून गच्छंती होणार? संचालक मंडळाच्या बैठकीकडे लक्ष

कथित वैयक्तिक संबंध आणि चीनशी संबंधित हेरगिरीच्या संशयामुळे एनव्हिडिया अडचणीत

वॉशिंग्टन डीसी : NVIDIA CEO Jensen Huang Investigation एनव्हिडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांचे दोन कथित विवाहबाह्य संबंध आणि हेरगिरीचा संशया या पार्श्वभूमीवर एनव्हिडियाचे संचालक मंडळ तियांना पदावरून हटवण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे वृत्त आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, हुआंग यांच्या कंपनीतील भवितव्यावर चर्चा करण्यासाठी एनव्हिडियाचे संचालक मंडळ गुरुवारी बैठक घेण्याची शक्यता आहे. जेन्सेन हुआंग यांनी विवाहबह्य संबंधांची कबुली दिल्यानंतर, एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने ‘वॅक्टेल, लिप्टन, रोसेन अँड कॅट्झ’ या नामांकित विधी फर्ममार्फत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

अमेरिकी संसदेत राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त

एनव्हिडिया प्रकरणाची गंभीर दखल अमेरिकी संसदेनेही घेतली आहे. हुआंग यांचे कथित संबंध एका कथित चिनी गुप्तहेर महिलेसोबत असल्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला काही धोका निर्माण झाला का, हा संसदेचा मुख्य चिंतेचा विषय आहे, असे अमेरिकेचे काँग्रेसमन जेमी रस्कीन म्हणाले. ”सीईओ म्हणून जेन्सेन हुआंग यांचे भवितव्य त्यांच्या कंपनीच्या संचालक मंडळावर अवलंबून आहे. परंतु, आमची मुख्य चिंता देशाच्या सुरक्षेची आहे. चीनने या ‘हनीपॉट’ योजनेद्वारे एका कॉर्पोरेट सीइओवर प्रभाव पाडला आणि त्यांच्या संपत्तीच्या माध्यमातून अमेरिकी राष्ट्रपतींवर दबाव आणून एनव्हिडियाच्या प्रगत एआय चिप्स चीनला विकण्यास भाग पाडले का, याचा तपास करणे गरजेचे आहे, असे रस्कीन यांनी स्पष्ट केले.

चक शूमर यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका

सिनेटमधील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते चक शूमर यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करताना म्हटले की, एनव्हिडियाच्या सीईओचे एका संशयित चिनी गुप्तहेरासोबत संबंध असल्याची माहिती एक वर्षापूर्वीच ट्रम्प यांना देण्यात आली होती, तरीही त्यांनी काहीही केले नाही. राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्याऐवजी ट्रम्प हे जेन्सेन हुआंग यांच्या बचावासाठी पुढे येत आहेत, असा आरोप त्यांनी केला.


‘मेगास्पीड’चे चौकशीत सहकार्याचे आश्वासन

यांच्याशी संबंधित वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेली ‘मेगास्पीड’ या तंत्रज्ञान कंपनीने गुरुवारी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या जोखमींबाबत सुरू असलेल्या तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
या प्रकरणात मेगास्पीडने गुरुवारी आपल्या पहिल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेच्या निर्यात नियंत्रण कायद्यांचे पालन करण्याच्या आपल्या जबाबदारीकडे कंपनी अत्यंत गांभीर्याने पाहते. मेगास्पीड अमेरिकी सरकारसोबत रचनात्मक आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्यास कटिबद्ध आहे.

Read About : Women Prefer Warmer Temperatures : महिलांना पुरुषांपेक्षा उबदार वातावरण का आवडते?
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.